पीएमपीएल बसमध्ये निर्जंतुकीकरण यंत्रणा; कोथरूड, कात्रज डेपोमध्ये फवारणी सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे महानगर परिवहन महामंडळाने कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर बस गाड्यांमध्ये निर्जंतुकीकरण फवारणी यंत्रणा सुरू केली आहे. बसच्या दोन्ही दरवाजात ही यंत्रणा सुरू करण्यात आल्याने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचा प्रवास सुरक्षित होणार आहे. पीएमपीएलच्या कोथरूड आणि कात्रज डेपोतील कर्मचाऱ्यांनी केवळ पाचशे ते सहाशे रुपयांच्या खर्चात ही यंत्रणा तयार केली आहे. सोडीयम हायप्रोक्लोराईडचा वापर करून दोन्ही दरवाज्यात सॅनिटायझर यंत्रणा सुरू करण्यात आली असल्याचे कोथरुड डेपोचे डीएमई नारायण भांगे यांनी सांगितले.

कोथरुड डेपोत सध्या प्रायोगिक तत्वावर सध्या एका बसमध्ये ही यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. तर, कात्रज डेपोतील दोन बसेसमध्ये ही यंत्रणा सुरू केल्याचे डीएमई विकास जाधव यांनी सांगितले. यामुळे बसमध्ये प्रवेश करताना दरवाजामध्येच फवारणी होत असल्याने निर्जंतुकीकरण होणार आहे. अत्यावश्यक सेवेसाठी वापरण्यात येणाऱ्या आणखी काही बसेसमध्ये येत्या दोन दिवसात ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. पीएमपीएल अध्यक्षा तथा व्यवस्थापकीय संचालिका नयना गुंडे यांच्या संकल्पनेतून ही यंत्रणा सुरू करण्यात आली असून यासाठी कोथरूड डेपो मॅनेजर चंद्रकांत वरपे, कर्मचारी राजाभाऊ पायगुडे, सागर जाधव, संजय हगवणे, अरविंद दुपटे सुनिल पाटोळे, पप्पू भोसले यांनी काम केले. सध्या एकूण 125 बसेस अत्यावश्यक सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.