
सामना ऑनलाईन, मुंबई
पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल टर्मिनस स्थानकाजवळ जपान तसेच सिंगापूरच्या धर्तीच्या आलिशान ‘पॉड’ हॉटेलची निर्मिती केली जाणार आहे. रेल्वे स्थानकावरील हे पहिले ‘पॉड’ हॉटेल तयार करण्यासाठी आयआरसीटीसीने रेल्वेकडे जागेची मागणी केली आहे.
केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली आहे. लांब पल्ल्यांच्या गाडय़ांतून प्रवास करून आलेल्या किंवा उपनगरीय रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तात्पुरत्या निवासासाठी ‘पॉड’ हॉटेलची निर्मिती करण्यात येणार आहे. छोटय़ा आकाराच्या खोल्या असल्याने अशाप्रकारच्या हॉटेलला जागा अत्यंत कमी लागते. अत्याधुनिक, आरामदायी अशा लहान आकाराच्या पॉड खोल्यांची उभारणी करण्यासाठी जागेची शोधाशोध सुरू असल्याचे आयआरसीटीसीचे प्रवक्ते पिनाकिन मोरावाला यांनी स्पष्ट केले. अंधेरीला अशाप्रकारचे पॉड हॉटेल असून त्या कंपनीकडून तांत्रिक बाबींसाठी सहकार्य घेतले जात आहे. आयआरसीटीसीकडून अशा 30 पॉड (खोल्या) ची उभारणी करण्यात येईल. गाडी येण्यासाठी तास दोन तास वेळ असेल किंवा रात्री उशिरा गाडी आली तर या पॉड हॉटेलमध्ये तात्पुरत्या राहण्याची व्यवस्था कमी खर्चात उपलब्ध होईल.
जपानी तंत्रज्ञान
आयआरसीटीसीकडून यासंदर्भात पश्चिम रेल्वे प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून मंजुरी मिळाल्याचे पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. कमी खर्चात आणि कमी जागेत आधुनिक डिझाइनच्या पॉड हॉटेल उभारण्यात येईल. प्रवाशांना येथे राहण्याची उत्तम सोय होणार आहे. पॉड हॉटेलची संकल्पना सर्वप्रथम जपान देशात मांडण्यात आली.
सोयीसुविधा
या पॉड हॉटेलमध्ये वाय-फाय, यूएसबी पोर्ट, टीव्ही, वातानुकूलित रूम, विश्रांतीसाठी आरामदायी व्यवस्था, विद्युत दिवे (याचा प्रकाश कमी-जास्त करण्याची व्यवस्था) आदी सुविधा असतील. हवेशीर जागा, सरकते दरवाजे, स्मोक डिटेक्टर अशा विशेष सुविधांचा लाभ प्रवाशांना घेता येईल. मुंबई सेंट्रल स्थानकावर उभारण्यात येणाऱ्या पॉडची सुविधा यशस्वी ठरल्यास इतर ठिकाणीही अशी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत विचार केला जाणार आहे.





























































