आश्रयदात्या कोल्हापूरच्या भूमीला पोलंडवासीयांनी केले वंदन!

833

दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या काळात निर्वासित म्हणून करवीर संस्थानात तब्बल सहा वर्षे वळीवडे येथील छावणीत आश्रय घेतलेल्यांसह पोलंडच्या 27 नागरिकांचे आज पाऊण शतकांनंतर करवीर नगरीत आगमन झाले. जिल्हा प्रशासनासह छत्रपती घराण्याकडुनही त्यांचे खास कोल्हापुरी पद्धतीने सर्वात करण्यात आले.दरम्यान गणेश विसर्जन मिरवणुकीत लेझीमचा ठेका आणि फुगडीचा फेर धरून मराठी संस्कृतीशी असलेले नाते अधिक घट्ट करून पोलंडवासीयांकडून या आपल्या दुसऱ्या मातृभूमीलाही वंदन करण्यात आले.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिटलरच्या छळामुळे भयभीत पोलंडवासीयांना ब्रिटीशांचा विरोध पत्करून हिंदुस्थानात केवळ जामनगर आणि करवीर संस्थानात आश्रय देण्यात आला होता.जामनगर येथे पाचशे आणि करवीर संस्थानात पाच हजार पोलंडवासीय निर्वासितांना आश्रय देण्यात आला होता.सन 1942 ते 48 या काळात करवीर संस्थानात वळीवडे येथे हे पोलंडवासीय त्यांच्यासाठी खास व्यवस्था करण्यात आलेल्या छावणीत वास्तव्यास होते. निर्वासित म्हणुन येथे बालपण व्यतीत केलेले आणि त्यांचे सहकारी असे एकूण 27 पोलंडवासीयांचे आज दुपारी अडीच वाजता मुंबईमार्गे उजळाईवाडी विमानतळावर आगमन झाले. याभूमीला वंदन करून वळीवडे कॅम्पच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. येथील विमानतळावर जिल्हा प्रशासनाच्या वतीने करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार शीतल मुळे, विमानतळ प्राधिकरणाचे संचालक कमल कटारिया, सचिन जाधव यांनी स्वागत केले. तसेच याज्ञसेनीराजे छत्रपती, खासदार संभाजीराजे छत्रपती,संयोगिताराजे छत्रपती आदी कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यासह फत्तेसिंह सावंत आदींनी कुंकुमतिलक लावून व पुष्पहार घालून त्यांचे कोल्हापूरी पद्धतीने स्वागत केले.

दरम्यान पोलंड देशाच्या वतीने उपपरराष्ट्र मंत्री प्रिझिदॅज यांच्या नेतृत्वाखाली द्विस्तरीय शिष्टमंडळ शुक्रवारी रात्री कोल्हापुरात दाखल होत आहे. त्यानंतर शनिवार 14 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजता ते कोल्हापूर शहरातील उद्योजकांशी संवाद साधणार आहेत. सन 1942 ते 1947 या काळात पाच हजार पोलंडवासीय निर्वासित म्हणून ज्या भागात राहत होते तेथे उभारण्यात आलेल्या स्मृती स्तंभाचे अनावरण मार्सिन प्रसिदॅज त्यांच्या हस्ते होणार आहे.या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेले 27 पोलंडवासीय, उपपरराष्ट्रमंत्री आणि उच्चस्तरीय सदस्य वळीवडे येथे भेट देणार आहेत. यामध्ये वळविडे येथे 1942 ते 1948 या काळात आपले बालपण व्यतीत केलेले पोलंडचे 13 नागरिक देखील सहभागी होणार आहेत. याच भागात एक कायमस्वरूपी संग्रहालय उभे करण्यात येणार आहे. कॅम्प वळीवडे येथील जीवन आणि काळ यांची आत्ताच्या व पुढील पिढ्यांना माहिती व्हावी हा या संग्रहालय उभारण्याचा उद्देश आहे. या संग्रहालयात त्या काळातील छायाचित्रे, चित्रे, कागदपत्रे, आणि इतर महत्त्वाच्या वस्तू तसेच साहित्य ठेवले जाणार आहेत. येत्या वर्षभरात हे संग्रहालय उभारण्यात येणार आहे.

वळीवडेतील बांगडीची 72 वर्षांची लुथांची आठवण..

वळविडे येथे 1942 ते 1948 या कालावधीत लुथा मारिया आईसमवेत राहत असताना आईने वळीवडे येथे कॅम्पमध्ये हातात घातलेली बांगडी पोलंडच्या निर्वासित महिलेने आठवण म्हणून जपून ठेवली आहे. 72 वर्षांपासून हातात असेलेली बांगडी स्टीलची असून हिंदुस्थानातील शाहु महाराजांच्या भूमीची आठवण जपून ठेवल्याचं लुथा मारिया यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या