दुचाकीची नंबरप्लेट वाकवली आणि ड्रग पेडलर पोलिसांच्या जाळ्यात; डोंबिवलीत सवादोन कोटींच्या ड्रग्जसह तिघांवर झडप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पोलिसांना संशय येऊ नये म्हणून ड्रग विकण्यासाठी आलेल्या पेडलर्सनी दुचाकीची नंबरप्लेट वाकवली आणि त्यांच्या या चुकीमुळेच ते पोलिसांच्या जाळ्यात अडकले. मानपाडा पोलिसांनी तीन ड्रग पेडलरना अटक करून त्यांच्याकडून २ कोटी १६ लाखांचे एमडी व कोकेन जप्त केले.

अमली पदार्थविरोधी पथक गस्त घालत पथक घालते होते. त्यावेळी त्यांना तीन इसमांच्या हालचाली संशयास्पद दिसल्या. त्यातील एक जण पिवळ्या रंगाच्या अॅक्टिव्हावर बसला होता. त्याने दुचाकीची नंबरप्लेट वाकवली होती. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला आणि ते चौकशीसाठी या त्रिकुटाकडे जाताच या तिघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र सतर्क पोलिसांनी पाठलाग करून तिन्ही आरोपींच्या घटनास्थळीच मुसक्या आवळल्या. त्यात एका नायजेरियन नागरिकाचा समावेश असून उर्वरित दोघांची नावे अविनाश सदरला (३४) आणि गजेंद्रन नायडू अशी आहेत. त्यांच्याकडून १ किलो ४ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले असून त्याची किंमत २ कोटी ८० हजार इतकी तर जप्त केलेल्या १५ ग्रॅम कोकेनची किंमत १५ लाख इतकी आहे. या दोघांकडून २१ हजार ५०० इतकी रोकडही जप्त करण्यात आली. ही कारवाई पोलीस आयुक्त ठाणे आशुतोष डुंबरे, सहआयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त (पूर्व) संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कल्याण पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या सूचनेनुसार अमली पदार्थविरोधी पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.