बदलापूरप्रकरणी फेक मेसेज व्हायरल करणाऱ्या 21 वर्षीय तरुणीला अटक

बदलापूरमधील पीडित मुलीचा मृत्यू झाला असून तिच्या आईने आत्महत्या केली आहे असे खोटे मेसेज व्हायरल करणाऱ्या 21 वर्षीय तरुणीला पोलिसांनी अटक केली आहे. अंबरनाथमध्ये राहणाऱ्या तरुणीने व्हायरल केलेल्या फेक मेसेजमुळे बदलापूरमधील वातावरण आणखी तणावपूर्ण  बनले होते.

आदर्श शाळेत 2 चिमुकल्यांवर शाळेतल्या स्वच्छता कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेनंतर बदलापूरमध्ये  नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला होता. या घटनेची दखल स्वतः मुंबई उच्च न्यायालयाने घेऊन तातडीची सुनावणी देखील घेतली. हायकोर्टाने राज्य सरकार आणि पोलिसांना फैलावर घेतलं होतं, लोकांनी रस्त्यावर उतरण्यापर्यंतची वाट तुम्ही पाहता का, अशा शब्दात सरकारला फटकारलं. हे प्रकरण अतिशय संवेदनशील बनलेले असताना अंबरनाथ येथील ऋतिका  शेलार  (21 ) या तरुणीने सोशल मीडियावर चुकीचे मेसेज व्हायरल करून नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण केला. पीडित मुलीचा मृत्यू झाला असून तिच्या आईने आत्महत्या केली आहे, अशा प्रकारचे मेसेज पाहिल्यानंतर नागरिकांमध्ये आणखी संताप उफाळून आला होता. याप्रकरणी सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या तरुणीचा शोध घेऊन तिला अटक केली. बदलापूरप्रकरणी व्हायरल होणाऱ्या मेसेजवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.