
मकरसंक्रांतीनिमित्त घराच्या छतावर घरगुती छोटे स्पीकर लावून त्यावर ‘धार्मिक गाणे का लावले?’ असे म्हणत मुस्लिम समाजातील काहीजणांनी एकाच्या घरात घुसून स्पीकरची केबल तोडून शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात तीनजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. त्यांना उद्यापर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
शोएब, सोहेल (जुडवा) व एक अनोळखी मुलगा (रा. आलमगीर, भिंगार) अशी आरोपींची नावे आहेत. ही घटना शुक्रवारी (दि. 14) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली होती. यासंदर्भात प्रभावती दशरथ मुंडे (रा. द्वारकाधीश कॉलनी, आलमगीर, भिंगार) यांनी फिर्याद दिली आहे.
मुंडे यांचा मुलगा वसंत याने मकरसंक्रांतीनिमित्त घराच्या छतावर घरगुती छोटे स्पीकर लावून त्यावर ‘हनुमान चालिसा’ लावली होती. यावेळी आरोपींनी मुंडे यांच्या घरात घुसून फिर्यादीला धक्का देऊन घराच्या छतावर जाऊन स्पीकरची केबल तोडून स्पीकर खाली फेकून नुकसान केले. तसेच मुंडे यांच्या मुलाला ‘परत ‘हनुमान चालिसा’ लावू नको,’ असे सांगून शिवीगाळ व दमदाटी करून आरोपी तेथून निघून गेले. याप्रकरणी भिंगार पोलिसांनी दोनजणांना अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक सतीश शिरसाठ तपास करीत आहेत.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिवसेनेचे नगर शहरप्रमुख संभाजी कदम, युवासेनेचे जिल्हा अधिकारी विक्रम राठोड, दिलीप सातपुते, माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी तत्काळ भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये धाव घेत या प्रकरणाचा गुन्हा तत्काळ दाखल करून आरोपींना अटक करण्याची मागणी केली. यावेळी भिंगारचे सहायक पोलीस निरीक्षक एस. के. देशमुख यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
























































