
सामना प्रतिनिधी । पुणे
कुटुंबीयाचा विरोध न झुगाराता तरुणीने प्रियकरासोबत आंतरजातीय विवाह केला. हा अपमान सहन न झाल्याने याचा बदला घेण्यासाठी तरुणीच्या भावाचे पिस्तुलच्या धाकाने अपहरण केले. सिंहगड रस्ता पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी तांत्रिक तपासासह कौशल्य पणाला लावून पुणे ते माण असा पाठलाग करून कुक्कडवाड घाटात अपहरणकर्त्यांना पकडून, तरुणाची सुटका करून हे फिल्मी स्टाईल अपहरणनाट्य संपुष्टात आणले.
विजय दबडे (वय २८, रा. आंबेगाव) याचे अपहरण करण्यात आले होते. नाथाजी काळेल आणि नवनाथ कारंडे या दोघांना अटक केली आहे. नंदू सुखदेव करांडे हा फरार आहे. शोभा दबडे (वय २५) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
विजय दबडे हे जिम ट्रेनर आहेत. नंदू कारंड हा शोभा यांचा सख्खा भाऊ आहे. शोभा या पुण्यात कामानिमित्त आल्यानंतर त्यांची विजय यांच्याशी ओळख झाली. त्यांच्या मैत्रीचे रूपांतर झाल्यानंतर विजय यांनी शोभासोबत विवाह करणार असल्याचे सांगितले. त्यांच्या घरच्यांनी होकार दिला, परंतु शोभा यांच्या घरच्यांनी नकार दिला. शोभा यांनी घरच्यांच्या विरोधात जाऊन विजयशी लग्न केले. त्यावेळी शोभा यांच्या घरच्यांनी आमच्या गावात अशा पद्धतीने लग्न करणाऱ्यांना गोळ्या घालतात अशी धमकी दिली होती.
बुधवारी सकाळी आठ वाजता विजय जिमला जात असताना नवले पुलाजवळ त्यांना आडविण्यात आले. रस्त्यामध्ये शोभा यांचा भाऊ नंदू आणि त्याच्या दोन साथीदारांनी त्यांना अडवून मारहाण केली. पिस्तुलाचा धाक दाखवून गाडीत घालून अपहरण केले. दरम्यान, विजय हे जिममध्ये आले नसल्याचे त्यांच्या पत्नीला कळविण्यात आल्यानंतर त्यांनी दिराला शोधण्यासाठी पाठविले. त्यावेळी त्यांना विजय यांची दुचाकी नवले पुलाजवळ पडल्याचे दिसले. त्यांनी चौकशी केली असता, काहीजणांनी मारहाण करून पिस्तुलचा धाक दाखवला व गाडीत घालून त्यांना घेऊन गेले असे सांगितले.
सिंहगड रस्ता पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पडलेल्या दोन मोबाइलमधील एका मोबाइल विजय यांचा, तर दुसरा मोबाइल नवनाथ काळेचा असल्याचे शोभा यांनी ओळखले. तेव्हा विजय यांचे अपहरण माहेरच्यांनी केल्याचा संशय आला. सिंहगड पोलिसांनी पुणे ग्रामीण, सारा आणि सोलापूर ग्रामीण पोलिसांना या प्रकरणाची माहिती देऊन अॅलर्ट केले.
तांत्रिक तपास करून आरोपींच्या मोबाइलचे लोकेशन काढून सिंहगड रस्ता पोलिसांनी पाठलाग सुरू केला. शेवटी सातारा जिल्ह्यातील माण-कुक्कडगाव घाटात विजयची सुटका केली. नाथाजी काळेल आणि नवनाथ करांडे यांना ताब्यात घेतले, तर नंदू पिस्तुलासह पळून गेला. वरिष्ठ निरीक्षक सरदार पाटील यांनी ही माहिती दिली.






























































