
घर किंवा गाळा भाडेतत्त्वावर देताना त्याची रीतसर माहिती स्थानिक पोलीस ठाणे अथवा सिटिझन पोर्टलवर देणे आवश्यक असतानाही तसे न करणे काही घर मालकांना महागात पडले आहे. याप्रकरणी पोलिसांनी काही घर मालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
भाडेतत्त्वावर घर किंवा गाळा घेऊन काही समाजकंटक किंवा गुन्हेगारी वृत्तीचे लोक नको ते कांड करतात आणि पसार होतात. दहशतवादी कृत्य करणारेदेखील भाडेतत्त्वावर घर घेऊन राहतात. त्यामुळे भाडेकरूंची माहिती पोलिसांना देणे बंधनकारक केले आहे. असे असतानाही त्याबाबतची माहिती पोलिसांना न दिल्याप्रकरणी दादर येथील रंजना गायकवाड व संतोष महाडिक, शिवाजी पार्क येथील विजय सरवटे आणि श्रीराम राव तसेच आरे सब येथील रिजवान चौधरी आणि रजत तिवारी या घर मालकांविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.