बोरीवली-विरार लोकलमधील संतापजनक घटना; लेडीज डब्यात तर्राट पोलीस शिपायाचा धिंगाणा, महिलांशी अश्लील गैरवर्तन, मोबाईलही हिसकावले

लेडीज डब्यात तर्राट पोलीस शिपायाने जोरदार धिंगाणा घातल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. अमोल सकपाळ असे या पोलीस शिपायाचे नाव असून त्याने बोरीवली-विरार लोकलमध्ये महिलांशी अश्लील गैरवर्तन केले आहे. इतकेच नाहीतर अनेकांना तिकीट आहे का, असा जाब विचारत त्यांचे मोबाईल देखील हिसकावले. याबाबत काही महिलांनी नायगाव स्थानकात तक्रार केल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी सकपाळ याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस शिपाई अमोल सपकाळ हा मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयात कार्यरत आहे. शनिवारी दुपारच्या सुमारास बोरीवलीवरून विरारच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये तो मीरा रोड स्थानकात चढला. यावेळी सकपाळ हा दारूच्या नशेत होता. याच दरम्यान त्याने महिलांशी अश्लील वर्तणूक करण्यास सुरुवात केली. याशिवाय सीटवर बसून काही महिलांना तिकीट विचारण्याचा प्रयत्न करतानाच महिलांकडे अश्लील नजरेने बघण्यास सुरुवात केली. इतकेच नव्हे तर काही महिलांचे मोबाईल फोन हिसकावून घेतल्याचाही आरोप महिलांनी केला आहे. नायगाव स्थानकापर्यंत सकपाळचा धिंगाणा सुरू होता.

संतप्त महिलांनी धक्के मारून खाली उतरवले
सकपाळ याला अनेक महिलांनी समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्यानंतरही त्याचे गैरवर्तन सुरूच होते. त्यामुळे कंटाळलेल्या महिलांनी या पोलीस शिपायाला नायगाव स्थानकात धक्के मारून खाली उत्तरवले व स्टेशन मास्तरकडे तक्रार केली. त्यानंतर स्टेशन मास्तरांनी वसई रोड रेल्वे पोलिसांना बोलावून घेतले. प्रवासी महिलांनी घडलेली सर्व हकीगत सांगितल्यानंतर या शिपायावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान डांगे यांनी दिली.