
बोरिवलीच्या रिवलीच्या एमएचबी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गणेश पवार हे आपल्या कामात व्यस्त असताना गुजरातचा अजय सुरेशभाई घागडा (वय 26) हा तरुण धापा टाकत पोलीस ठाण्यात (गेल्या आठवड्यात दुपारी 3 च्या सुमारास) धडकला. स्टेशन हाऊसला असलेल्या ड्युटी ऑफिसरला तो म्हणाला, “साहेब, आमच्या एका सहकाऱ्याने आमच्या कंपनीचे 14 कोटी रुपयांचे सोने पळविले आहे. आम्ही ज्या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबलो होतो, त्याच रूममधून तो दागिन्यांच्या बॅगा घेऊन पळाला आहे.” तेथे हजर असलेल्या वरिष्ठ पोलीस निरिक्षक गणेश पवार यांनी याची गंभीर दखल घेतली. सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशीकुमार मीना, उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक आयुक्त सुनील जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या पथकाला सोबत घेऊन ज्या ठिकाणी 14 कोटी रुपयांचे दागिने लुटण्यात आले होते, त्या बोरिवली (पश्चिम) येथील क्लब अॅक्वेरिया टॉवरमध्ये धाव घेतली. तेथील सीसीटीव्ही तपासले आणि तपास सुरू केला.
फिर्यादी अजय सुरेशभाई घागडा आपल्या तक्रारीमध्ये म्हणतो, चेतन सोनी या मालकाची गुजरातमध्ये जे. पी. एक्सपोर्ट गोल्ड अॅण्ड डायमंड ज्वेलरी या नावाची कंपनी आहे. गेल्या आठवड्यात कंपनीमध्ये सोन्याच्या दागिन्यांवर सुंदर डिझाईन केलेले (विशेषतः हातातील बांगड्या व अंगठ्या) सोने आम्ही तामीळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आदी राज्यांत विकले. आम्ही पुन्हा मुंबईतील मालकाच्या बोरिवली येथील क्लब अॅक्वेरिया टॉवरमधील कंपनीच्या फ्लॅ टमध्ये विश्रांतीसाठी चाललो असता माझ्याच सोबत असलेल्या जिग्नेश नाथाभाई कुछडिया (वय 19) या कर्मचाऱ्याने 13 किलो सोन्याच्या दोन सॅक बेंगा घेऊन पलायन केले. जिग्नेश हा 3 महिन्यांपूर्वीच जे.पी. एक्सपोर्ट कंपनीत नोकरीला लागला होता, असेही अजय घागडा याने एफआयआर मध्ये स्पष्ट केले.
एमएचबी पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने अजय घागडा याने दिलेल्या माहितीवरून दहिसर जकात नाका, बोरिवली रेल्वे व विमानतळावर तसेच राजकोट-जुनागडच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांच्या टुर्स अॅण्ड ट्रॅव्हलच्या आसपास फिल्डिंग लावली. जिग्नेश हा गुजरातच्या जुनागडचा असल्याचे उघड झाल्यावर वरिष्ठ पोलीस निरिक्षक गणेश पवार यांनी वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे आपले एक पथक राजकोटला पाठविले, परंतु आरोपी हे महिंद्रच्या थार या जीपने (अहमदाबाद महामार्गे) गुजरातला निघाले आहेत अशी खबर मिळाली. त्यानंतर एमएचबी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल आव्हाड, बाबुलाल शिंदे, गणेश तोरगल, गणेश तारणे, वैभव साळुंखे, नीलेश पाटील, संदीप गोरडे, वसीम शेख, मंगेश किरपेकर, साखरे, परीट, साळुंके, देवकर, आहेर, शरमाळे, मस्के, मोरे, मंजुळे हे पथक आरोपीच्या मागोमाग गुजरातला पोहोचले. भिलार जकात नाक्यावर आरोपी जिग्नेशची सीसीटीव्ही फुटेजमध्ये ओळख पटली. त्यानंतर पोलिसांनी सुसाट वेगाने आरोपीचा पाठलाग केला. आरोपी आपल्या जुनागडच्या गावात पोहोचला. पोलीस आपल्या मागे आहेत हे लक्षात आल्यावर आरोपीने व त्याच्या बापाने आपल्या घरापासून जवळ असलेल्या जंगलात चोरीचे दागिने खड्डा खणून पुरून ठेवले, परंतु एमएचबी पोलिसांच्या विशेष पथकाने पुरलेले 13 पैकी 11 कोटींचे दागिने केवळ 72 तासांत (आरोपीसह) परत मिळविले. आरोपी जिग्नेशचा पाठलाग करीत जगभरात नावलौकिक असलेले मुंबई क्राईम ब्रँचचे अधिकारीही गुजरातला पोहोचले होते, परंतु बाजी एमएचबी पोलिसांनी मारली, त्यांना यश मिळाले.
देशभरात सोन्याच्या दागिन्यांची ने-आण करणाऱ्या जे. पी. एक्सपोर्ट कंपनीच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारायचा कट जिग्नेशचे वडील नाथाभाई (वय 50) याने रचला होता. खून, खुनाचा प्रयत्न, दारूविक्री आदी गुन्हघांची नाथाभाईविरोधात गुजरात पोलिसांत नोंद आहे. 14 कोटी रुपयांच्या चोरीप्रकरणी एमएचबी पोलिसांनी जिग्नेश, त्याचे वडील नाथाभाई व थार जीप चालविणारा यश जिवाभाई ओडेदरा अशा तीन जणांना केवळ 72 तासांत अटक करून सोन्याचे दागिने परत मिळविले.
एमएचबी पोलिसांनी जुनागड येथे जाऊन पकडलेले बापलेक हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत याबद्दल कोणतीही खातरजमा न करता जिग्नेश नाथाभाई या तरुणाला करोडो रुपयांच्या दागिन्यांची ने-आण करण्यासाठी देशभरात प्रसिद्ध असलेल्या कंपनीच्या मालकाने नोकरीला का ठेवावे याचे आश्चर्य वाटते. अलीकडे अंधेरी येथेही नितेश तिवारी या नोकराने के. बी. शाह ज्वेलर्सचे 44 लाखांचे दागिने पळविले होते, परंतु अंधेरी पोलिसांनी त्याच्या गावी जाऊन त्याला पकडून आणले. नोकराचा पूर्वेतिहास, त्याचे चारित्र्य माहीत नसेल तर तुम्ही कधी बाराच्या भावात जाल याचा नेम नाही. तुमच्या जिवावरही बेतू शकते.
एम. एन. सिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त असताना दिंडोशी पोलीस ठाण्याचा सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार देठे हा एका हिरे चोराच्या शोधात गुजरातच्या खेड्यात साध्या वेषात आपल्या शिपायाला घेऊन (हिऱ्याच्या रिकव्हरीसाठी) गेला होता. तेव्हा त्या आरोपीने गावकऱ्यांना गोळा करून नंदकुमार देठेंवर हल्ला केला. त्यात देठेंचा मृत्यू झाला. असे काही अघटित घडू नये म्हणून मुंबईच्या एमएचबी पोलिसांनी गुजरातच्या स्थानिक पोलिसांची मदत घेऊन (सरकारी खाकी वर्दीत) जुनागडमधील गाम विस्तार गावात धाड घातली व मुद्देमालासह 3 आरोपींना बेड्या घालून मुंबईत आले. अशा या धाडसी कारवाईबद्दल मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती व सह पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी वरिष्ठ पोलीस निरिक्षक गणेश पवार व त्यांच्या पथकाचे कौतुक केले आहे. त्यांना शाबासकी दिली आहे.