
>> प्रभाकर पवार
मीरा-भाईंदरमध्ये मराठी जनांना मोर्चा काढण्यास परवानगी न देणारे व मोर्चा काढण्यापूर्वीच त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारे मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे आयुक्त मधुकर पांडे यांची गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उचलबांगडी केली व पोलीस महासंचालक कार्यालयात अप्पर पोलीस महासंचालक (प्रशासन) म्हणून त्यांची नियुक्ती केली, तर मीरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे आयुक्त म्हणून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक निकेत कौशिक यांची नियुक्ती केली. मधुकर पांडे यांची हकालपट्टी करण्यात आल्याने मीरा-भाईंदरमधील आयुक्तालयातील बहुसंख्य पोलिसांनी व नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
मीरा-भाईंदर-वसई-विरार महानगरपालिका हद्दीतील वाढती लोकसंख्या व गुन्हेगारी लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने २०२० साली मीरा भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयाची स्थापना केली. २ सप्टेंबर २०२० रोजी कर्तव्यकठोर, प्रामाणिक तसेच नेतृत्व गुणसंपन्न अधिकारी म्हणून महाराष्ट्र पोलीस दलात प्रतिमा असलेल्या सदानंद दाते यांची राज्य शासनाने मीरा-भाईंदर-वसई-विरारचे पहिले पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती केली. आयुक्तालयाची स्थापना झाली तेव्हा पोलीस दलात फारच कमी मनुष्यबळ होते तरीही सदानंद दाते यांनी वाढलेल्या गुन्हेगारीला आळा घातला, ती आटोक्यात आणली. सदानंद दाते म्हणजे कडक शिस्तीचे अधिकारी, त्यामुळे त्यांच्या कारवाईत कधी कुणी किंवा राजकीय पुढाऱ्यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला नाही. सराईत गुन्हेगारांनी. लेडीज बारवाल्यांनी तर सदानंद दाते यांच्या नावाचा धसकाच घेतला होता. त्यांच्या काळात हॉटेल बार वेळेत बंद व्हायचे. गुन्हेगारी आटोक्यात आली. दोषसिद्धी (Conviction rate) ९० टक्क्यांपर्यंत वाढली. ठाणे, पुणे. नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई, सोलापूर, पिंपरी-चिंचवड या पोलीस आयुक्तालयांमध्ये मीरा-भाईंदर आयुक्तालयाची कामगिरी (2 सप्टेंबर 2020 ते 13 डिसेंबर 2022 पर्यंत) सरस ठरली. सदानंद दाते यांनी मीरा-भाईंदर आयुक्तालयाची प्रतिमा वाढविली असतानाच त्यांची बढती देऊन बदली करण्यात आली. सदानंद दाते यांना महाराष्ट्र अतिरेकीविरोधी पथकाचे प्रमुख करण्यात आले, तर त्यांच्या जागी मधुकर पांडे यांची नियुक्ती करण्यात आली.
मधुकर पांडे यांनी 14 डिसेंबर 2022 रोजी मीरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयात आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. सदानंद दाते यांची बदली झाल्यावर स्थानिक गुंडांना, लेडीज बारवाल्यांना हायसे वाटले. रात्री दीड वाजता बंद होणारे लेडीज बार पहाटेपर्यंत चालू लागले. सत्ताधारी स्थानिक आमदार आदी राजकीय पुढाऱ्यांचा हस्तक्षेप वाढला. मोकळ्या भूखंडावर कंटेनर टाकून जागा काबीज करण्यात येऊ लागल्या. जागेच्या मूळ मालकांना हुसकावून लावण्यात येऊ लागले. त्यांच्यावर केसेस घेण्यात आल्या. गुन्हेगारी झपाट्याने वाढली तर Conviction rate एका झटक्यात खाली आला. हे आम्ही नव्हे तर आकडेवारी सांगते. पोलिसांचे कामात लक्ष नव्हते. फक्त वसुली हेच त्यांचे लक्ष्य होते. मीरा-भाईंदरमध्ये वाढत चाललेले हुक्का पार्लर, अमली पदार्थांची वाहतूक व त्यातून मिळत असलेला अमाप पैसा पाहून नया नगरच्या एका पोलिसाने आपल्या लातूर येथील गावाजवळ ड्रग्ज उत्पादन करायचा कारखानाच उभारला होता. मीरा-भाईंदर आयुक्तालयाच्या हद्दीत कोणत्याही पान टपरीवर आज गुटखा मिळतो. ड्रग्जची खरेदी-विक्री करणाऱ्यांना पोलिसांकडून संरक्षण मिळते. त्यामुळे काशीमिरा-नवघर काशिगाव समाजसेवा शाखा आदी पोलीस ठाण्यांत पोस्टिंग मिळविण्यासाठी पोलीस निरीक्षक लाखो रुपये मोजतात. नवीन ऑर्केस्टा बारचा परवाना बार मालकांना ५० लाखांत मिळतो असे एजंट सांगतात. मधुकर पांडे यांनी गेली अडीच वर्षे मीरा-भाईंदर ज्या पद्धतीने चालविले, त्याला तोड नाही. सामान्य नागरिकांकडे दुर्लक्ष करणाऱ्या मधुकर पांडे यांच्याकडे बांधकाम व्यावसायिक, बारवाले आदी व्यावसायिकांची, सत्ताधारी पुढाऱ्यांची गर्दी असायची. मधुकर पांडे यांनी आपल्या कार्यालयाला कॉर्पोरेट लुक दिला होता, परंतु त्यांनी भ्रष्टाचाराला उत्तेजन देणारी, पोलिसांची प्रतिमा मलिन करणारी प्रॅक्टिस सुरू केली होती, टेंडर न भरणाऱ्या वरिष्ठ निरीक्षकांना डावलून दुय्यम दर्जाच्या अकार्यक्षम अधिकाऱ्यांना मोक्याच्या व क्रीम पोस्टिंग दिल्या. हे ज्यांच्याकडे गृहखाते आहे. त्या देवेंद्र फडणवीस यांना माहीत नाही असे होणार नाही.
मधुकर पांडे यांच्याकडून अत्यंत थंड डोक्याचे अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निकेत कौशिक यांनी सूत्रे हाती घेतली आहेत. निकेत कौशिक हे एक अत्यंत हुशार, मितभाषी आयपीएस अधिकारी आहेत. मुंबईत या अधिकाऱ्याने अधिक काळ नोकरी करून आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. त्यांच्या पत्नी या आयएएस अधिकारी आहेत. अशा हा सुखवस्तू कुटुंबातील अधिकारी कुठल्या मोहाला, राजकीय पुढाऱ्यांच्या हस्तक्षेपाला बळी पडणार नाही असे पोलीस दलात बोलले जाते. सदानंद दाते यांनी मीरा-भाईंदर पोलिसांची प्रतिमा जपली होती. निकेत कौशिकही ती जपतील. वाढलेल्या गुन्हेगारीला आळा घालतील, ड्रग्ज माफियांचे उच्चाटन करतील अशी अपेक्षा मीरा-भाईंदरवासीय करीत आहेत.