
पावणेदोनशे वर्षांचा इतिहास असलेल्या मध्य मुंबईतील ब्रिटिशकालीन समृद्ध समृद्ध शाळेत 12 वी शिकणाऱ्या एका 16 वर्षीय मुलाचे लैंगिक शोषण त्यालाच शिकविणाऱ्या एका 40 वर्षीय विवाहित शिक्षिकेकडून करण्यात आल्याचे उघड झाल्याने या महिलेला पोक्सो’ कायद्यांतर्गत गेल्या आठवड्यात दादर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
याआधी पुण्यातील खडक पोलिसांनी 10 वीत शिकत असलेल्या एका 14 वर्षीय विद्यार्थ्यांचे शाळेच्या बंद वर्गात एका 25 वर्षीय शिक्षिकेकडून लैंगिक शोषण करताना तिला रंगेहाथ पकडले होते. तिलाही अत्याचार संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) अटक करण्यात आली होती. चेंबूर येथे घरी शिकवणीला जाणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याच्या एक शिक्षिका प्रेमात पडली व त्याच्याबरोबर विवाहही केल्याचा त्या शिक्षिकेने दावा केला, परंतु पोलिसांनी पालकांच्या तक्रारीवरून मुलगा अल्पवयीन असल्याने रोज घरी जाऊन विद्यार्थ्यांचे ट्यूशन घेणाऱ्या महिलेला अटक केली. शाळा-कॉलेजातील असे धक्कादायक प्रकार रोज उघडकीस येत असल्याने पालकांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
महागडी फी असलेल्या एका इंग्रजी शाळेत 16 वर्षांचा अक्षय (बदलेले नाव) इयत्ता बारावीत शिकत होता. अक्षय घरी असतानाच त्याच्या घराची बेल वाजली. तेव्हा त्याचे आई-वडीलही घरी होते. दरवाजा उघडल्यावर समोर एक साधी राहणीमान असलेली महिला दिसली. “आपण कोण?” असा प्रश्न विचारल्यावर ती म्हणाली, “अक्षय घरात आहे का? मला xxx या अक्षयच्या शिक्षिकेने पाठविले आहे. अक्षयने मॅमकडून उसने पैसे घेतले आहेत. ते पैसे मॅमने परत मागितले आहेत किंवा अक्षयने मॅमला फोन करावा असा मला निरोप देण्यास सांगितले आहे.” असे बोलून ती महिला निघून गेली. सधन कुटुंबातील अक्षयच्या आई-वडिलांना धक्का बसला. आमच्या मुलाला पैशांची गरजच काय? तो वाया तर गेला नाही ना? असाही प्रश्न त्यांना पडला. कारण बऱ्याच महिन्यांपासून अक्षय निराश दिसत होता. तो बंद खोलीत एकाकी राहत होता. कुणाशी बोलायचा नाही. त्यामुळे आई-वडिलांची शंका बळावली. आपला मुलगा खरोखरच बिघडला आहे याची ती महिला निरोप देऊन गेल्यावर आई-वडिलांना खात्री पटली. आई-वडिलांनी अक्षयला खोदून खोदून विचारले तेव्हा तो म्हणाला, “होय आई-बाबा, मी बिघडलो आहे. मला माझ्या शाळेत इंग्रजी शिकविणाऱ्या मॅममुळेच मी नैराश्यामध्ये (depression) आहे. मी मॅमला माझ्या मोबाईलमधून ब्लॉक’ केले आहे. मॅम कोणताही संदेश पाठवू किंवा माझ्याशी संपर्क साधू शकत नाहीत म्हणून मॅमने युक्ती शोधून तिच्या मोलकरणीला आपल्या घरी पाठविले, जेणेकरून मी मॅमला संपर्क साधेल. मी काही मॅमकडून पैसे घेतलेले नाहीत आणि आता मी कधी त्यांना भेटणारही नाही. कारण आता मी 12 वी पास झालो आहे. मला त्या शाळेत पुन्हा जायचे नाही” असे बोलून अक्षयने गेल्या वर्षभरात मॅमकडून भोगलेल्या शरीरसुखाची, लैंगिक अत्याचाराची कहाणीच आई-वडिलांसमोर कथन केली. हा सारा अनपेक्षित धक्कादायक प्रकार ऐकून आई-वडील निःशब्द झाले. काय बोलावे, काय करावे हेच त्यांना सुचेना. ते थेट अक्षयला दादर पोलीस ठाण्यात घेऊन गेले. तेथे शिक्षिकेविरुद्ध तक्रार नोंदविली.
अक्षय आपल्या जबाबात म्हणतो. “मॅम इतर मुलांपेक्षा माझ्याशी जास्त जवळीक साधायच्या, बोलायच्या. एक दिवस त्या मला दक्षिण दक्षिण मुंबईतील एका तारांकित हॉटेलात घेऊन गेल्या. तेथे त्यांनी मला मद्य पाजले. एकदा तर त्यांनी आपल्या कारमध्येच माझ्याबरोबर लगट केली. त्यानंतर मॅम आपल्या मर्जीप्रमाणे बोलवायच्या, हॉटेलात घेऊन जायच्या. माझ्याशी मस्ती करायच्या. मला हे सारे सोसेनासे झाले. मला थकवा येऊ लागला. चिडचिडेपणा वाढला. तेव्हा मॅमने मला depressionच्या गोळ्या देण्यास सुरुवात केली. हे सारे मला असह्य झाल्याने मी मॅमना मोबाईलमधून ब्लॉक केले. त्यांच्याशी असलेला संपर्क तोडला. तरीही त्यांनी आपल्या मोलकरणीला माझ्या घरी पाठवून माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.”
अक्षयच्या या अधिकृत निवेदनावरून अक्षयच्या पालकांनी आपला मुलगा अल्पवयीन असल्याने शिक्षिकेविरुद्ध ‘पोक्सो’ कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची पोलिसांना विनंती केली. दादर पोलिसांनी तत्काळ शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला गेल्या आठवड्यात अटक केली. कोणताही आजार नसताना depressionच्या गोळ्या घेण्यास अक्षयला भाग पाडणाऱ्या त्या शिक्षिकेच्या डॉक्टर महिलेविरुद्धही पोलिसांनी ‘पोक्सों’ कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून या डॉक्टर महिला सध्या परदेशात आहेत. भारतात परतल्यावर त्यांना तत्काळ अटक करण्यात येणार आहे.
अक्षयची शिक्षिका आपल्या कबुली जबाबात म्हणते, “माझे अक्षयवर प्रेम आहे. आम्ही जे काही एकमेकांशी संबंध ठेवले आहेत ते संमतीने ठेवले आहेत. त्यात कोणतीही बळजबरी नाही.” त्यावर पोलीस म्हणतात, “मुलगा अल्पवयीन, अज्ञानी आहे. 18 वर्षे पूर्ण झाल्यावर त्याला सज्ञान म्हणता येईल. त्यामुळे आरोपी महिलेच्या स्टेटमेंटला काहीही अर्थ नाही.” त्या शिक्षिकेने आपल्या शिक्षकी पेशाला काळिमा फासला आहे.
शिक्षक महिलांप्रमाणे पुरुष शिक्षकांकडून अल्पवयीन विद्यार्थिनीवर तर मोठ्या प्रमाणात अत्याचार केले जात आहेत. अलीकडे कोल्हापूर, बारामती, बुलढाणा, रायगड आदी जिल्ह्यांत डझनभर विद्यार्थिनींवर शिक्षकांकडून अत्याचार करण्यात आल्याचे उघड झाले आहे. शाळा असो किंवा ट्यूशन क्लास असोत, तेथे अल्पवयीन मुले-मुली असुरक्षित आहेत. सज्ञान श्वापदांपासून अल्पवयीन मुलांना धोका निर्माण झाला आहे. शाळा म्हणजे एक पवित्र मंदिर, शाळा म्हणजे माता! प्रेमाचे, संस्काराचे प्रतीक त्याला विषयासक्त प्रवृत्ती गालबोट लावत आहेत. १६ वर्षीय अक्षयचे लैगिक शोषण करणारी 40 वर्षीय महिला ही कंत्राटी शिक्षिका होती. तिचे चारित्र्य, पूर्वेतिहास शाळेला माहीत नव्हता असे पोलीस सांगतात. शाळा-कॉलेजातील मुले ड्रग्जच्या आहारी जात आहेत. त्यांच्या समुपदेशनात सामाजिक संस्था, सरकार गुंतले असतानाच शाळा-कॉलेजातील विषयासक्त शिक्षक शिक्षिकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशा प्रवृत्तींना जर चाप बसला नाही तर शाळा-कॉलेजांचे पावित्र्य संपून जाईल.