पोलीस निरीक्षकासह वकिलाविरोधात लाच स्वीकारल्याचा गुन्हा; अॅण्टी करप्शन ब्युरोची कारवाई

वांद्रे रेल्वे पोलीस ठाण्यात दाखल गुह्यात अटक न करण्यासाठी आरोपीकडे 10 लाखाची मागणी करून रेल्वे गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकाने वकिलाच्या माध्यमातून साडे चार लाखांचा दुसरा हप्ता स्वीकारल्या प्रकरणी अॅण्टी करप्शन ब्युरोने दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

रोहित सावंत असे पोलीस निरीक्षकाचे तर अरुणकुमार सिंग असे वकिलाचे नाव आहे. वांद्रे रेल्वे पोलिसांत एक गुन्हा दाखल असून त्यात तक्रारदाराच्या दाजीला अटक करण्यात येणार होती. पण अटकेची कारवाई टाळण्यासाठी रेल्वे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रोहित सावंत यांनी अरुणकुमार या वकिलामार्फत 10 लाखांची मागणी केली. त्यानुसार तक्रारदार यांनी पाच लाख दिले. दरम्यान उर्वरित पाच लाख देण्यासाठी सावंत व सिंग यांनी तक्रारदाराने तगादा लावला होता. त्यामुळे तक्रारदार यांनी अॅण्टी करप्शन ब्युरोकडे धाव घेतली. तक्रारीनुसार रोहित सावंत यांच्या सांगण्यावरून अरुणकुमार यांनी आधी पाच लाख नंतर साडेचार लाख स्वीकारल्याचे कबूल केल्याने अॅण्टी करप्शन ब्युरोने गुन्हा दाखल केला आहे.