दत्तवाड येथील मटका-जुगार अड्ड्यावर धाड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । शिरोळ

शिरोळ तालुक्यातील दत्तवाड येथील नूर काले यांच्या मनोरंजन क्लबमध्ये तीन पानी जुगार व मटका घेताना इचलकरंजी पोलीस उपाधीक्षक धीरज पाटील यांच्या पथकाने धाड टाकली. या कारवाईत २२ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चार चाकी १ बोलेरो, ६३ मोटारसायकली १७ मोबाइल संच आणि २८ हजार ४०० असा सुमारे २३ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

शनिवारी सायंकाळी सुरू झालेली कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती या कारवाईत इचलकरंजी पोलीस उपाधीक्षक धीरज पाटील स्वतः हजर होते दरम्यान या जुगार अड्ड्य़ावर या महिन्यात दोनदा कारवाई झाल्यामुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे. याबाबतची फिर्याद पो. ना. सागर हारगुले यांनी दिली असून कुरुंदवाड पोलीस ठाण्यात मुंबई जुगार प्रतिबंध कलमाखाली गुन्हा नोंद झाला आहे.

दत्तवाड येथील दानवाड मार्गावर असलेल्या नूर काले यांचा साहारा कला क्रीडा नावाचा क्लब आहे मात्र या क्लबमध्ये बेकायदेशीररित्या मटका आणि तीन पानी जुगार सुरू असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक धीरज पाटील यांना समजली त्यानुसार सायंकाळी सहाच्या सुमारास यांच्या पथकाने अचानक दत्तवाड येथील नूर काले यांच्या क्लबवर धाड टाकली. पोलीस आल्याचे समजताच अनेकांनी क्लब लगत असणाऱ्या ऊस शेतीतून पळून गेले. यावेळी शिरोळ तालुक्यातील दत्तवाड सह कर्नाटक सीमा भागातील लोकांचा समावेश आहे. या कारवाईमध्ये कुरुंदवाड पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे, पोलीस उपनिरीक्षक प्रेमकुमार केदार यांच्या सह कुरुंदवाड पोलीस कर्मचारी पथकाची रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती.