नगरमध्ये पोलीसभरतीसाठी आलेल्या उमेदवाराकडे आढळले ‘स्टेरॉइड’चे इंजेक्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या पोलीसभरतीसाठी आलेल्या उमेदवाराकडे ‘स्टेरॉइड’चे इंजेक्शन आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. संबंधित तरुणाच्या रक्त, लघवीचे नमुने तपासणीसाठी नाशिकला पाठविण्यात आले असून, त्याचा अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी दिली.

शेख सोहेल शेख सलीम (रा. आझादनगर, मालेगाव, जि. नाशिक) असे ‘स्टेरॉइड’ आढळलेल्या उमेदवाराचे नाव आहे. हा उमेदवार कुस्ती खेळाशी संबंधित असून, पोलीसभरतीसाठी त्याने अर्ज दाखल केला आहे.

नगरमधील पोलीस मुख्यालयाच्या मैदानात पोलीसभरतीची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी नगरसह इतर जिल्ह्यांतून तरुण नगरमध्ये भरतीसाठी येत आहेत. सैन्यभरती असो किंवा पोलीसभरती, या भरतीसाठी अशा प्रकारे इंजेक्शनचा वापर करण्यास मनाई आहे. मात्र, स्टेरॉइडमुळे तात्पुरती ऊर्जा वाढत असल्याने अशा इंजेक्शनचा वापर केला जातो. गुरुवारी (दि. 12) पोलीसभरतीदरम्यान एका उमेदवाराकडे ‘मेफेनटरमाइन सल्फेट’ या कंपनीचे ‘स्टेरॉइड’चे घटक असलेले इंजेक्शन आणि तीन सीरिंज आढळून आल्याने खळबळ उडाली. संबंधित उमेदवाराची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करून रक्त व लघवीचे नमुने पोलिसांनी नाशिक येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. वैद्यकीय चाचणी अहवालात ‘स्टेरॉइड’चे सेवन केल्याचे आढळून आल्यास संबंधित तरुणावर पुढील कारवाई केली जाणार आहे.

दरम्यान, गुरुवारी शिपाईपदासाठी पुरुषांची मैदानी चाचणी पूर्ण झाली आहे. आता महिला-मुलींची चाचणी होत आहे. शिपाईपदासाठी 4 जानेवारीपासून भरतीप्रक्रिया सुरू आहे. 11 हजार 278 उमेदवारांचे अर्ज आले होते. त्यातील पात्र ठरलेल्या 5048 जणांची चाचणी झाली. गुरुवारी 1160 उमेदवारांना बोलाविण्यात आले होते. त्यांपैकी 820 जण हजर होते, तर 340 जण गैरहजर होते. 67 जणांना तपासणीमध्ये अपात्र ठरविण्यात आले. उर्वरित 753 जणांची चाचणी घेण्यात आली. दोन दिवस रोज एक हजार उमेदवारांना बोलाविण्यात आले आहे. त्यानंतर भरतीप्रक्रियेतील मैदानी चाचणीचा टप्पा पूर्ण होणार आहे.