
गुह्यामध्ये अटक न करता नोटीस देऊन सोडण्याच्या मोबदल्यात 60 हजारांच्या लाचेची मागणी करणाऱया विश्रामबाग पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अकबर खताळसो हवालदार (वय 53, रा. अल्फान्सो स्कूलजवळ, मिरज) असे अटक केलेल्या उपनिरीक्षकाचे नाव आहे. तक्रारदाराचा भाऊ व इतर दोघांविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. या गुह्यात तक्रारदाराच्या भावाला अटक न करता नोटीस देऊन सोडण्यासाठी, तसेच तपासात मदत करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक अकबर हवालदार याने 60 हजार रुपयांची मागणी केली होती. यानंतर तक्रारदाराने सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. जानेवारी ते फेब्रुवारी या दोन महिन्यांत तक्रारीची पडताळणी करण्यात आली. यात तक्रारदाराच्या भावाला अटक न करता नोटीस देण्यासाठी गुह्यात मदत करण्यासाठी 60 हजार रुपयांची मागणी करून सुरुवातीला 50 हजार व नंतर 40 हजार रुपयांवर तडजोड झाल्याचे निष्पन्न झाले होते.