पोलीस उपनिरीक्षकाला लाचप्रकरणात अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 खासगी प्रवासी वाहनांवर कारवाई न करण्यासाठी 12 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱया सदर बझार पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. सोलापूर रेल्वे पोलीस चौकीत ही कारवाई करण्यात आली आहे.

प्रशांत सूर्यकांत क्षीरसागर (वय 34) असे अटक केलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. तक्रारदार तसेच त्यांच्या ओळखीचे काहीजणांच्या खासगी प्रवासी वाहतूक करणाऱया गाडय़ा आहेत. या गाडय़ा रेल्वे स्टेशन पोलीस चौकी परिसरात उभ्या करतात. या वाहनांवर कारवाई न करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक प्रशांत क्षीरसागर याने मासिक हप्ता स्वरूपात 13 हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती 12 हजार रुपये घेण्याचे ठरले. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार आल्यानंतर पथकाने रेल्वे स्टेशन चौकीतच सापळा रचला. तक्रारदाराकडून पैसे घेताना क्षीरसागर याला रंगेहाथ पकडण्यात आले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी, हवालदार शिरीषकुमार सोनवणे, पोलीस नाईक श्रीराम घुगे, अतुल घाडगे, प्रमोद पकाले, कॉन्स्टेबल उमेश पवार, शाम सुरवसे यांनी ही कारवाई केली आहे.