
उदय जोशी । बीड
भाजपा आमदार सुरेश धस यांनी खुन्नस मनात धरून आष्टीतील तालीम पाडली. आष्टी मध्ये त्यांच्याच आशीर्वादाने दादागिरी वाढली. त्याचा निषेध करीत भाजपाचेच जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष सतीश शिंदे यांनी उपोषणाचा एल्गार पुकारला आहे. या संधीचा फायदा उठवत शत्रूचा शत्रू म्हणजे आपला मित्र हा फॉर्म्युला वापरत धनंजय मुंडे यांनी गुरूवारी जिल्हा रुग्णालय गाठले आणि शिंदेचे उपोषण सोडवण्याचे श्रेय मिळवले. स्वता: शिंदे यांनी आपण राष्ट्रवादी सोबत राहण्याचा संकल्प करत भाजपाला धक्का दिल्याने बीड जिल्ह्याची राजकीय समीकरणंच बदलू लागली आहेत.
राजकारणाच्या दृष्टीने बीड जिल्हा अतिशय संवेदनशील म्हणून ओळखला जातो. बीड जिल्ह्याचे राजकारण नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. एकीकडे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला तर दुसरीकडे स्व. गोपीनाथराव मुंडे यांची जन्म आणि कर्मभूमी. या मुळेच बीड जिल्ह्याच्या राजकारणाचे पडसाद राज्याच्या राजकारणावर उमटलेले अनेकदा आपण पाहिले आहेत. प्रस्थापित राजकारण्यांची मक्तेदारी हे बीड जिल्ह्याचे वैशिष्ट्ये ठरले आहे. धक्कातंत्राचा वापर हे बीडचे राजकीय आयुध मानले जाते. कधी थेट शरद पवारांना तर स्व. गोपीनाथराव मुंडे यांना या धक्कातंत्राचे आघात सहन करावे लागले आहेत. निवडणुका जस जशा जवळ येत आहेत तसे राजकारण वातावरणही तापू लागले आहे. परंपरागत राजकीय शत्रू म्हणून ओळखणारे राष्ट्रवादी आणि भाजपा एकमेकांविरूद्ध कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे दिसून येत आहे.
आष्टी विधानसभा मतदार संघात भाजपाचा बोलबाला आहे. आमदार भीमराव धोंडे आणि आता राष्ट्रवादीला धक्का देत भाजपात येऊन विधान परिषदेवर विजय मिळवलेले आमदार सुरेश धस यांच्या मुळे आष्टी मतदार संघावर भाजपाने मोठी पकड मिळवली आहे. मात्र भाजपातील अंतर्गत राजकारण धुसमुसतच राहिले आहे.
आष्टी येथील एक तालीम अनधिकृत असल्याचे म्हणत आमदार सुरेश धस यांनी जमीनदोस्त केली अन वादाची ठिणगी पेटली. पंकजाताई मुंडे यांचे कट्टर समर्थक जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष सतीश शिंदे यांनी आमदार सुरेश धस यांच्या विरुद्ध रणशिंग फुकले आणि थेट उपोषणाचा मार्ग धरला. पाच दिवस शिंदे हे धस यांच्यावर कारवाई करा या मागणीसाठी लढा देत होते. पोलिसांनी बळाचा वापर करून माझे उपोषण तोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सतीश शिंदे यांनी केला. उपोषण सुरूच राहिले. समर्थक असूनही पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी धस – शिंदे यांच्यातील वादाकडे दुर्लक्ष केले. याचाच फायदा सुरेश धस यांचे कट्टर विरोधक आणि विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी उठवला.
रात्री अकरा वाजता जिल्हा रुग्णालयात धाव घेऊन उपोषणाला बसलेल्या भाजपाच्या जिल्हा परिषद सदस्य शिंदेची चौकशी केली. त्यांचे उपोषण ही सोडवले. त्यांना मानसिक आधार दिला. या तत्परतेमुळे सतीश शिंदे सारखा धडाकेबाज युवक राष्ट्रवादीला अलगद सापडला. पालकमंत्र्याना आमच्याकडे लक्ष देण्यास वेळ नाही. धनंजय मुंडे धावून आले. आता या पुढे आपण आपली राजकीय भूमिका बदलणार असल्याचे संकेत त्यांनी दिल्याने जिल्ह्याचे राजकारण पुन्हा अस्थिर झाले आहे.























































