सोलापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे वेगात बदलली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उल्हास सोनार । माढा

विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र रणजित सिंह मोहिते पाटील यांनी कमळ हाती घेतल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे वेगात बदलत असून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला हा धक्का बसला आहे.

राज्याच्या राजकीय पटलावरील मोहिते पाटील व पवार यांच्या मधील गेल्या कित्येक वर्षांपासून असलेला छुपा संघर्ष आता उघड सुरु झाल्यानंतर मोहिते पाटील यांनी “कमळ” हाती घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढील अडचणीत वाढ झाली असून विखे-पाटलांनंतर मोहिते- पाटील यांनाही पवार रणनीतीचा फटका बसल्याने त्यानी भाजप जवळ केला असला तरी त्याचे दीर्घकाळ परिणाम काँग्रेस आघाडीवर दिसून येतील.

राज्याच्या राजकारणात विजयसिंह मोहिते पाटील हे तत्कालीन मुख्यमंत्री वसंत दादा पाटील यांचे समर्थक तर शरद पवार वसंतदादांचे विरोधक. वसंतदादांच्या निधनानंतर दोघांनीही राजकीय तडजोडीतून समेट घडविला तरीही अंतर्गत कुरघोडी सुरूच होत्या. मोहिते पाटील यांनी 1999 मध्ये पवारांच्या राष्ट्रवादी मध्ये जाणं पसंत करीत पुढील राजकीय वाटचालीत पवार निष्ठा हेच बलस्थान होते. तरीही पक्षात स्वतंत्र दवाब गट कार्यरत ठेवून स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवले.

2003 साली सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री झाले असता त्या वेळी याच दबावतंत्रांचा वापर करून मोहिते पाटील यांनी उपमुख्यमंत्रीपद घेतले, हे थोरल्या पवारांना कितपत रुचले हे अजूनही ठाऊक नाही आणि पक्षातूनच राजकीय कोंडी करण्यात येवू लागली. त्यांचे आवडते सार्वजनिक बांधकाम खातेच्या ऐवजी त्यांना ग्रामविकास खाते देण्यात आले.

अजित पवार यांनी आक्रमकपणे सोलापूरच्या राजकारणात लक्ष द्यायला सुरुवात केली आणि मोहिते पाटील यांचे राजकीय पंख छटू लागले. जिल्ह्यातील मोहिते समर्थकांना त्यांच्याच विरोधात बळ देण्याचे काम धाकट्या पवारांनी करत दूध संघ, जिल्हा परिषद, जिल्हा मध्यवर्ती बँक, या सहकारी संस्थांतून बाजूला ठेवून त्यावर कडी केली. 2009 साली पवारांनी या मतदारसंघातून दिल्ली गाठली आणि मोहिते पाटील यांच्या विरोधात मोहीम अधिक तीव्र झाली. याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पंढरपूर मतदारसंघात त्यांना पराभव पत्करावा लागला. पवारांनी बबनराव शिंदे, दीपक आबा साळुंखे, सुधाकर पंत परिचारक, याचबरोबर अजितनिष्ठ संजय शिंदे, प्रशांत परिचारक यांना बळ दिल्याने जिल्ह्यातील राजकारणातही मोहिते पाटील बाजूला पडले.

2014 साली याच पक्षांतर्गत विरोधकांनी लोकसभा निवडणुकीत त्यांना पाडण्याचा पुरेपुर प्रयत्न केला परंतु माळशिरसने मोदी लाटेतही विजय मिळवून दिला. 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विद्यमान खासदार म्हणून राष्ट्रवादीकडून माढा मतदार संघाचे एकमेव प्रबळ दावेदार परंतु शरद पवारांच्या लोकसभा लढविण्याच्या निर्णयामुळे व पक्षांतर्गत साठमारीमुळे तिकिटासाठी ताटकळत रहावं लागले आणि त्याची परिणीती भाजपाचे कमळ हाती घेण्यात झाली. त्यांच्या या निर्णयाचे पडसाद शेजारच्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातही उमटतील हे निश्चितच.