राजकीय पक्ष हा लोकशक्तीवर चालत असतो. कुणाच्या घराणेशाहीवर पक्ष चालत नाही, अशा शब्दांत अजित पवार गटाचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यसभेत संधी न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
लोकसभेतील पराभवानंतर अवघ्या दहा दिवसांत सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर वर्णी लावण्यात आल्याने अजित पवार गटात अस्वस्थता आहे. या जागेसाठी प्रबळ दावेदार असतानाही संधी न मिळाल्याने छगन भुजबळ यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.
राजकारणात असे चालतच असते. आपण बघत राहायचं असं किती चालतंय ते. लोकही सगळं बघत असतात, व्यक्त होत असतात. आपली मतं बनवत असतात. एक मात्र लक्षात ठेवायला हवे की, कुठलाही राजकीय पक्ष असो, तो लोकशक्तीवर चालतो, कुणाच्या घरावर अथवा घराण्यावर चालत नाही, असे भुजबळ म्हणाले.
राजी-नाराजीचा प्रश्न नाही, पण मी पक्षात सर्वात ज्येष्ठ आहे. त्यामुळे माझ्या प्रदीर्घ अनुभवाचा दिल्लीत नक्कीच लाभ झाला असता. पक्षाची बाजू मांडणे असो की राज्यातले प्रश्न मांडणे, त्यांची सोडवणूक करणे असो… अशा वेळी अनुभव, प्रतिमा यांचा नक्कीच विचार होत असतो. संसदेत शरद पवार, सोनिया गांधी, खरगे आदी ज्येष्ठ व अनुभवी दिग्गज समोर असणार. तिथे नवख्यांचा टिकाव कितपत लागेल हा सारा विचार करूनच मी दिल्लीला जाण्यास इच्छुक होतो, असे भुजबळ म्हणाले.