आयआयटी मुंबई करणार दूषित पाण्याचे शुद्धीकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

देशातील आणि जगातील पाण्याची गरज लक्षात घेऊन पाणी शुद्धीकरणाच्या दृष्टीने उपाययोजना करणे ही काळाची गरज बनली आहे. ती ओळखून आयआयटी मुंबईसह देशातील चार संस्थांमधील शास्त्रज्ञ एका छताखाली येऊन संशोधन करणार आहेत. त्यासाठी आयआयटी मुंबईमध्ये जागतिक दर्जाच्या पाणी संशोधन केंद्राची स्थापना आज करण्यात आली.

आयआयटी मुंबई, आयआयटी हैदराबाद, पुण्यातील राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा आणि गांधीनगरमधील पंडित दीनदयाळ पेट्रोलियम विद्यापीठ या चार संस्थांचे शास्त्रज्ञ या संशोधन केंद्रात संशोधन करणार आहेत. केंद्र सरकारच्या माहिती-तंत्रज्ञान विभागाने या केंद्राला निधी पुरवला आहे. नद्या आणि समुद्रामध्ये सोडले जाणारे सांडपाणी तसेच धातूमिश्रित दूषित पाण्यावर प्रक्रिया करणे, खारट पाण्यावर प्रक्रिया करून ते शुद्ध करणे, पाण्याचे व्यवस्थापन याशिवाय पाणीबचतीसाठी प्रयत्न करणे असे काम या केंद्राद्वारे होणार आहे.

आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. देवांग खाखर यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. समाजासमोर निर्माण झालेली पाणीटंचाईची समस्या दूर करण्यासाठी या केंद्राच्या माध्यमातून समाज आणि उद्योगजगताला परवडतील असे उपाय शोधले जातील, असा विश्वास यावेळी प्रा. खाखर यांनी व्यक्त केला.