धुळेकरांना गढूळ पाण्याचा पुरवठा,नगरसेवक, नागरिकांची ओरड

सामना ऑनलाईन, धुळे

शहराला पाणीपुरवठा करणाऱया जलस्त्राsतांच्या क्षेत्रात पाऊस झाला असला तरी शहरात नियमित पाणीपुरवठा होत नाही. गेल्या काही दिवसांपासून तर नागरिकांना गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. पाणी शुध्दीकरणाची तांत्रिक प्रक्रिया पूर्णपणे राबविली जात नाही, असे गंभीर चित्र पुढे आले आहे. अनेक नगरसेवकांनी ओरड करूनदेखील पाणी पुरवठा विभागावर कुठलाही परिणाम झालेला नाही. गढूळ पाण्यामुळे साथीचे आजार पसरले तर जबाबदार कोण? असा सवाल आता नगरसेवक आणि नागरिक उपस्थित करीत आहेत.

धुळे महापालिकेची डिसेंबर 2018 मध्ये निवडणूक झाली. त्यावेळी दररोज शुध्द आणि पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होईल असे आश्वासन देण्यात आले होते, पण जवळपास सहा महिने झाले तरी पाणीपुरवठा व्यवस्थेत कुठलाही बदल झालेला नाही. जलस्त्राsताच्या क्षेत्रात पाऊस होऊनदेखील महापालिकेने विस्कळीत झालेले पाणीपुरवठय़ाचे वेळापत्रक स्थिर आणि निश्चित केलेले नाही. त्यामुळे अनेक भागात आठवडय़ातून दोनदा आणि तोही अनिश्चितवेळी पाणीपुरवठा होतो. त्यामुळे पिण्याचे पाणी मिळविणे धुळेकरांसाठी दिव्यकर्म ठरत आहे.

पावसाला सुरुवात झाल्यानंतर नियमित पाणी येईल असा आशावाद धुळेकरांना आहे. पण वस्तुस्थिती पाहता दररोज पाणीपुरवठा करण्याची घोषणा हवेतच विरली आहे. उलट गेल्या काही दिवसांपासून शहरातील सर्वच भागात गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. नळाद्वारे आलेले पाणी पिण्याच्या उपयोगात आणायचे कसे? असा प्रश्न नागरिकांना पडतो. गढूळ पाणी निथळ करण्यासाठी नागरिक आपापल्या पध्दतीने घरगुती उपाय करीत आहेत. त्यासाठी जीवड्रापसह इतर वस्तूंचा वापर होतो. परंतु पाणी किती शुध्द होते हा प्रश्न अनुत्तरित असतो. पाणीपुरवठा करण्यापूर्वीच तो शुध्दीकरणाच्या तांत्रिक प्रक्रियेतून पुढे यावा अशी अपेक्षा आहे. पण तसे होत नाही. सरसकट गढूळ पाण्याच्या पुरवठय़ामुळे आता काही भागात साथीचे आजार बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा, महापालिकेने शुध्दीकरणाच्या प्रक्रियेकडे लक्ष केंद्रित करावे. निथळ आणि शुध्द पाण्याचा नळाद्वारे पुरवठा व्हावा अशी अपेक्षा धुळेकरांची आहे.

आपली प्रतिक्रिया द्या