
सामना प्रतिनिधी । परभणी
महानगरपालिकेने शहरात विशेष मोहिम राबवून पॉलिथीन जप्त केले होते. हे जप्त केलेले पॉलिथीन हॉटमिक्स रस्ता तयार करण्यासाठी वापर करण्यात आला आहे. त्यामुळे परभणी महानगरपालिकेचा हा स्तुत्य उपक्रम मराठवाड्यात पहिलांदाच करत असल्याची माहिती मनपा आयुक्त रमेश पवार यांनी दिली आहे.
परभणी शहरात महानगरपालिकेच्या वतीने विशेष मोहिम राबवून पॉलिथीन जप्त करण्यात आले होते. जप्त करण्यात आलेल्या या पॉलिथीन पिशव्यांचे करायचे काय? हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी नामी शक्कल लढविण्यात आली आहे. जप्त केलेले पॉलिथीन हे रस्त्याच्या कामास उपयुक्त ठरत असल्याचे निष्पन्न झाल्याने मनपाने जप्त केलेले सर्व पॉलिथीन पिशव्या रस्ता भरणीच्या कामासाठी वापरण्याचा उपक्रम राबविला आहे.
हॉटमिक्सच्या डांबरामध्ये पॉलिथीन पिशव्या टाकण्यात आल्या. रस्त्यावर खडीवर डांबरासह पॉलिथीन पिशव्या अंथरण्यात आल्याने रस्ता मजबुतीला बळकटी आली आहे. या संदर्भात बोलताना मनपा आयुक्त रमेश पवार यांनी शहरामध्ये मनपाच्या वतीने राबविण्यात आलेल्या पॉलिथिन पिशव्यांच्या संदर्भात केलेल्या कारवाईमध्ये या पिशव्या जप्त केल्यानंतर यांचे करायचे काय? असा प्रश्न निर्माण झाला होता. रस्ता कामासाठी या पिशव्या उपयुक्त असल्याने सध्या शहरामध्ये अंतर्गत रस्ते दुरुस्तीचे काम सुरु आहे. यात या पिशव्यांचा वापर केला जात असून मराठवाड्यात प्रथमच हा उपक्रम राबविण्यात येत आहे, अशी माहिती पवार यांनी दिली.




























































