पूजा खेडकरचे दिव्यांग प्रमाणपत्र खोटं, दिल्ली पोलिसांची कोर्टाला माहिती

माजी ट्रेनी आयएएस पूजा खेडकर यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच आहेत. पूजा खेडकर यांचे दिव्यांग प्रमाणपत्र बोगस आहे अशी माहिती दिल्ली पोलिसांनी कोर्टाला दिली आहे, तसेच हे प्रमाणपत्र नगरच्या वैद्यकीय विभागाकडून जारी करण्यात आलं नव्हतं असेही सांगितले आहे. पूजा खेडकर यांनी 2022ते 2023 दरम्यान स्पर्धा परीक्षेवेळी हे दिव्यांग प्रमाणपत्र जमा केलं होते.

युपीएससी परीक्षा देताना पूजा खेडकरने हे प्रमापत्र सादर केलं होतं. परीक्षेत कमी गुण मिळूनही पुजा खेडकरने याच प्रमाणपत्रांच्या जोरावर ही परीक्षा पास झाली होती. पूजाचा संपूर्ण देशात 841 वा क्रमांक आला होता. आता दिल्ली गुन्हे शाखेच्या तपासात हे प्रमाणपत्र बोगस असल्याचे निष्पण्ण झाले आहे.

दिल्ली पोलिसांनी न्यायालयाला दिलेल्या अहवालानुसार 2022 आणि 2024 साली मल्टिपल डिसॅबिलिटीचे प्रमाणपत्र सादर केले होते. हे प्रमाणपत्र खोटे असू शकतात. कारण वैद्यकीय विभागाकडे हे प्रमाणपत्र पडताळून पाहिले तर त्यांनी असे कुठल्याही प्रकारचे प्रमाणपत्र जारी केल्याचा इन्कार केला आहे. पूजा खेडकरने जे प्रमाणपत्र जमा केले होते ते आम्ही जारी केलेच नाही असे स्पष्टीकरण वैद्यकीय विभागाने दिले आहे.

आपण 47 टक्के दिव्यांग आहोत असा दावा पूजा खेडकर यांनी केला होता. ओल्ड अँटीरियर क्रुसिएट लिगामेंट फुटल्याने आणि डाव्या गुडघ्याला दुखापत झाल्याचे पूजा खेडकर यांनी एका मुलाखातीत म्हटले होते. महाराष्ट्रातल्या एका रुग्णालयाने याची पुष्टी केल्याचेही खेडकरांनी म्हटले होते. युपीएससी परीक्षेत दिव्यांगातून आरक्षणासाठी 40 टक्के दिव्यांग असणे गरजेचे आहे पण आपण 47 टक्के दिव्यांग असल्याचा दावा पूजा खेडकरांनी केला होता.

पुण्यातील यशवंतराव चव्हाण मेमोरियल रुग्णालयाने पूजा खेडकरांना सात टक्के दिव्यांग असल्याचे घोषित केले होते. त्यांच्या डावा पाय लोकोमोटर दिव्यांग असल्याचे सांगितले गेले. पण फिजियोथेरपी विभागाने पूजा खेडकर दिव्यांग नसल्याचे म्हटले आहे. आता पूजा खेडकरच्या दिव्यांग प्रमाणपत्रावून रुग्णालयाच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.