
पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी हिंदुस्थानकडून ऑपरेशन सिंदूरची घोषण झाली. याअंतर्गत हिंदुस्थानने पाकिस्तानला पळता भुई थोडी केली. त्यामुळे अपयशाने चवताळलेल्या पाकिस्तानने पूंछ सेक्टरमध्ये गोळीबार केला. या गोळीबारात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. पूंछमध्ये अनेक नागरिकांची घरे उद्ध्वस्त झाली. त्यामुळे लोकांना त्यांची घरे आणि गावेही सोडावी लागली. यामध्ये कौर कुटुंबाचा समावेश आहे. कौर कुटुंबाची मुलगी जपनीत कौरने या हृदयद्रावक घटनेची आपबीती सांगितली.
बीसीसी या वृत्तसंस्थेशी बोतलाना जपनीत कौरने पूंछमध्ये झालेल्या हल्ल्याबद्दल सांगितले आणि भावना व्यक्त केल्या. या गोळीबारात जपनीतने तिचे वडील अमरिक सिंग यांना गमावले. वडिलांच्या निधनामुळे त्यांच्या घरावर दुख:चा डोंगर कोसळला आहे. ‘माझे वडील आम्हाला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. मुलांना काहीही करून वाचवले पाहिजे, असे त्यांना वाटत होते. पण आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही. आम्हाला वाटलंच नव्हतं की 2 मिनिटांत असं काही घडेल घडेल, असे जपनीत यावेळी म्हणाली.
‘ते पुंछचाही बदला घेतील का?’ – जपनीत कौरचा सवाल
दरम्यान, जपनीतने यावेळी सरकारलाही धारेवर धरले. “मला माहित नाही की ते कोणत्या प्रकारचा न्याय देत आहेत. पहलगामच्या पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले होते. आता ते आमच्यासाठी कोणत्या प्रकारचे ऑपरेशन सुरू करतील? पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात माझ्या वडिलांना जीव गमवावा लागलाय. हे सरकार माझ्या वडिलांच्या प्राणाचा बदला घेतील का?”असा कठोर सवाल यावेळी तिने उपस्थित केला.
“माझ्या वडिलांचा मृतदेह येथे पडला होता. सतत गोळीबार सुरू होता. पण यात आम्हाला कोणत्याही प्रकारची सुरक्षा नव्हती. आमच्या कुटुंबातील एक सदस्य गेला आहे, आता आणखी काय जाईल माहित नाही. पूंछमधली सध्याची परिस्थिती इतर कोणालाही समजू शकत नाहीए. लोकांना युद्धबंदी नको आहे. लोकांना हा संघर्ष सुरूच राहावा असे वाटते. पण ज्याने कुटुंबातील सदस्य गमावला आहे तोच त्याचे दुःख आणि वेदना समजू शकतो, असे ती यावेळी म्हणाली.