
संतोष तागडे, आष्टी
पावसाच्या लहरीपणीचा जबरदस्त फटका मराठवाड्यातील असंख्य शेतकऱ्यांना बसला आहे. पेरणी केल्यानंतर गायब झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. ब्रम्हगाव इथल्या चंद्रकांत शिंदे यांनाही हे नुकसान सहन करावे लागले असून त्यांनी नाईलाजास्तव ४-५ फऊ वाढलेले मुगाचे पीक उपटून फेकून दिले आहे.
पावसाने दडी मारली म्हणून शिंदे यांनी विहिरीच्या पाण्यावर मुगाचे पीक वाढवले. शेंगधरणीरम्यान पिकावर मावारोग पडला, या रोगामुळे मुगाच्या शेंगा जळू लागल्या. शिंदे यांनी तीन वेळा औषध फवारणी केली मातर मावारोग काही गेला नाही. पिकासाठी तेरा हजार रुपये खर्च आला परंतु उत्पन्न मात्र काही मिळणार नसल्याने नाईलाजस्तव या शेतकऱ्याला पीक उपटून फेकून द्यावे लागले आहे. पिकासाठी झालेला खर्चही न निघाल्याने शिंदे कुटुंबीय अर्थिक अडचणीत सापडले आहे. शासनाने तालुक्यात अद्याप कोठेही पिकांचे पंचनामे केले नसल्याने शेतक-यांना नुकसान भरपाई मिळेल की नाही या बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कृषी विभागाने आमच्या अडचणींची तत्काळ दखल घेऊन तालुक्यातील पिकांची परिस्थिती पाहावी आणि शेतक-यांच्या हिताचा निर्णय घ्यावा अशी मागणी बऱ्याच शेतकऱ्यांनी केली आहे.



























































