कोट्यवधींची मंदिरे उभारण्यापेक्षा गावोगावी जलमंदिरे उभी करा – पोपटराव पवार

सामना प्रतिनिधी । पाथर्डी

लोकवर्गणीतून गावोगावी कोट्यवधींची मंदिरे उभारण्यापेक्षा पाणी फाऊंडेशनच्या चळवळीत सहभागी होऊन गावोगावी जलमंदिरे उभी करा अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार यांनी व्यक्त केली. पंचायत समिती सभागृहात आज पाणी फौंडेशनच्या वतीने प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी देवदत्त केकाण होते तर या वेळी तहसीलदार नामदेव पाटील,राजेंद्र कासार,प्रशांत तोरवणे,जिल्हा समन्वयक विक्रम फाटक, देविदास पवार,तालुका समन्वयक संतोष दहिफळे, सचिन चव्हाण,प्रा. संपत गर्जे { पुणे } आदी व्यासपीठावर उपस्थीत होते.

पवार म्हणाले की, कितीही पाऊस पडला पण पाणी वापराचे नियोजन व अंदाज पत्रक तयार नसेल तर भर पावसाळ्यात टंचाई परिस्थितीशी मुकाबला अटळ आहे. पर्जन्यमानामध्ये वर्षागणिक घट होत आहे. पावसाचा लहरीपणा पीक पद्धतीला हानिकारक ठरत आहे. भगीरथाने स्वर्गातून गंगा आणल्या पासूनचा काळ अभ्यासला तर पाण्याचे दुष्काळ अनेकवेळा पडले आहेत. मात्र तत्कालीन राज्यकर्त्यांनी व समाज धुरिणांनी उपाय योजना करत रयतेला जिवंत ठेवले. त्या काळी लोकसंख्या कमी व जीवनशैली साधी होती म्हणून पाणी कमी लागे मात्र आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. पाण्याचे इनकमिंग म्हणजे फक्त पाऊस असे सूत्र आता विसरायला हवे. सर्व प्रकारच्या वापरातून पाणी गावासाठी शिल्लक किती ठेवले,त्या मध्ये बचत साधून पुर्नवापर कसा केला याचा विचार आवश्यक आहे. पाणी फौंडेशनने गावोगावी जलजागृती करून या चळवळीला लोक चळवळीचे रूप दिले. या चळवळीने लोकांचा विश्वास संपादन केला. लोकांना ही चळवळ आपली वाटून कोट्यवधींची कामे श्रमदानातून झाली. जनतेचा विश्वास हेच यशाचे खरे गमक ठरून असह्य उन्हात सुद्धा लोकांनी मनापासून श्रमदान केले.