
‘इस्रो’ मध्ये वैज्ञानिक असल्याचे सांगून उच्चशिक्षित आणि हायप्रोफाईल महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढणाऱ्या एका अट्टल भामट्याला नवी मुंबई गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. नवी मुंबईतील या खरातबाबाचे नाव आदर्श म्हात्रे असे असून त्याने तब्बल १२ हून अधिक नावांचा वापर करून सुमारे ११ महिलांचे लैंगिक आणि आर्थिक शोषण केल्याचे समोर आले आहे.
अवघ्या दहावी पास असलेल्या आदर्श म्हात्रे याने ‘शादी डॉट कॉम’, ‘जीवनसाथी’ आणि ‘टिंडर’ यांसारख्या प्लॅटफॉर्मवर आपली बनावट प्रोफाईल्स तयार केली होती. तो कधी इस्रोचा वैज्ञानिक तर कधी पीडब्ल्यूडीमधील अधिकारी असल्याचे सांगायचा. आपले राहणीमान एखाद्या मोठ्या अधिकाऱ्यासारखे ठेवून तो डॉक्टर, इंजिनीयर आणि बँक अधिकाऱ्यांसारख्या उच्चशिक्षित महिलांना हेरायचा. लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करणे आणि त्यानंतर पैशांची गरज असल्याचे भासवून लाखो रुपये उकळणे, ही त्याची कार्यपद्धती होती.
एकीकडून पैसे लुबाडायचे दुसरीवर खर्च करायचे
आदर्श हा एका महिलेकडून लुबाडलेले पैसे दुसऱ्या महिलांसाठी वापरायचा. उरलेली रक्कम तो मौजमजा व चैनीच्या आयुष्यावर तसेच कॅसिनोत उडवायचा. त्याने केवळ नवी मुंबईतच नव्हे तर ठाणे, मुंबई, पिंपरी-चिंचवड, नागपूर आणि यवतमाळ अशा विविध शहरांतील अनेक महिलांना आपल्या जाळ्यात ओढले आहे. आतापर्यंत त्याच्यावर महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यात ११ गुन्हे दाखल झाले आहेत.































































