बंगळुरू : लॉकडाऊन आणि बेरोजगारीमुळे हिंसा अधिक भडकल्याचा पोलिसांना संशय

465

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे बंगळुरूतील हिंसाचार अधिक भडकला असावा अशी पोलिसांना शक्यता वाटत आहे. हिंसाचाराप्रकरणी झालेल्या प्राथमिक तपासातून त्यांनी ही शंका व्यक्त केली आहे. 11 ऑगस्ट रोजी रात्री 9.30 च्या सुमारास काँग्रेस आमदार श्रीनिवास मुर्ती यांच्या घरावर जमावाने हल्ला चढवला होता. हल्लेखोर त्यांच्या घरात घुसले होते आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावर नुकसान केले होते. त्यांच्या पुतण्याच्या फेसबुक पोस्टमुळे हा जमाव भडकला होता असं सांगण्यात येतंय. या हिंसाचारामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला होता.

पोलिसांच्या तपासात दिसून आलं आहे की लॉकडाऊन काळामध्ये रोजगार नसल्याने आणि उत्पन्न थांबल्याने अनेक घरांमध्ये असंतोष धुमसत होता.हजारो माणसे मंगळवारी रस्त्यावर उतरली होती. त्यांनी मोठ्या प्रमाणावर जाळपोळ आणि तोडफोड केली होती. पोलिसांच्या गाड्यांनाही त्यांनी लक्ष केले होते. पथदिवे फोडल्यानंतर पोलिसांना अंधारात दिसत नव्हतं. याचा फायदा उचलत दंगेखोरांनी हाताला लागेल ते उचलून फेकायला सुरुवात केली. दगड-विटा, फुलदाणी, लाकड्याच्या फळ्या , जुनी भांडी भरलेल्या गोणी ही पोलिसांवर फेकली जात होती. पोलिसांवर हल्ला केल्यानंतर बहुतांश माणसं पळून गेली होती. पोलिसांनी घरोघरी जाऊन चौकशीला सुरुवात केली तेव्हा त्यांना बहुतांश घरात फक्त महिला असल्याचं दिसलं. या परिसरातील 85 टक्के पुरूष हे एकतर बेरोजगार होते किंवा त्यांना निश्चित उत्पन्न मिळत नव्हतं असं पोलिसांना चौकशीत कळालं.

दंगलीत सहभागी झालेले लोकं हे झोपडपट्टीत राहणारे असून लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर त्यांना घराबाहेर पडणं मुश्कील झालं होतं. लॉकडाऊन शिथील होत गेला मात्र तोपर्यंत त्यांच्या नोकऱ्या गेल्या होत्या. इथे राहणारे लोकं हे वेठबिगारी करणारे किंवा छोटंमोठं काम करणारे आहेत. लॉकडाऊन काळात त्यांच्या हातातले सगळे पैसे संपले होते. ऑनलाईन शाळा सुरू झाल्यानंतर शाळांनी फीचे पैसे मागायला सुरुवात केली. या सगळ्याचा परिणाम या लोकांवर झाला होता आणि ते अस्वस्थ झाले होते. परिस्थिती सुधारत नसल्याने ते संतापलेही होते असं पोलिसांचं म्हणणं आहे. इथली लोकं CAA विरोधातील आंदोलनातही सहभागी झाली होती. या लोकांची माथी भडकावून त्यांचा सहजपणे वापर करता येऊ शकतो असे पोलिसांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या