दापोली तालूक्याच्या मुख्यालयाकडून दाभोळ बंदर गावाकडे जाणारा दापोली-दाभोळ नावाचा रस्ता हा वाहतुकीच्यादृष्टीने अतिशय महत्वाचा रस्ता आहे. या मार्गावरच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे चिखलगाव आहे, शिवाय या मार्गावरून सुप्रसिध्द पन्हाळेकाजी लेण्यांकडे जाण्याचा मार्गही आहे. वाहतुकीच्यादृष्टीने अतिशय महत्वाच्या असलेल्या या मार्गावर रस्त्याच्या मधोमध ठिकठिकाणी पडलेले भले मोठे खड्डे वाहतुकीस अडथळा ठरत आहेत. त्यामुळे या मार्गावरून वाहतुक करणे आता धोक्याचे झाले आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या कोणाही प्रवाशांचा रस्त्याच्या दुरवस्थेमुळे हकनाक बळी जावू नये यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यात पडलेले खड्डे बुजवून वाहतुक सुरळीत आणि विना अपघात होण्यासाठी प्राधान्य दिले पाहीजे. मात्र सुस्त बांधकाम प्रशासन या महत्वाच्या समस्येकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे प्रवाशांना या मार्गावरून प्रवास करताना आपला जीव मुठीत घेवूनच प्रवास करावा लागत आहे.
दापोली तालूक्यातील दाभोळ या ऐतिहासिक गावासह या मार्गावरील अन्य गावांकडे जाणा-या मार्गावर उंबर्ले गावाच्या हद्दीत जिल्हा परिषद उंबर्ले शाळे समोरील रस्त्याबरोबरच साधारणपणे दिड किलोमीटर अंतर लांबीच्या रस्त्यावर ठिकठिकाणी भले मोठे महाकाय खड्डे पडले आहेत. हे खड्डे वाहतुकीस अडथळा ठरत आहेत त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गावरील सुरळीत आणि विना अपघात वाहतुकीसाठी रस्त्यातील खड्डे बुजवून रस्ता वाहतुक योग्य करणे आवश्यक बाब असली तरी सार्वजनिक बांधकाम विभाग प्रषासन या महत्वाच्या समस्येकडे ढुंकूनही पाहत नाही.
या मार्गावरून किमान 19 महत्वांच्या गावांसाठीचा जाण्या येण्याचा मार्ग आहे. येथील लोकांना दापोलीत सरकारी कामे, नित्यपयोगी सामान खरेदी असेल, विद्यार्थ्यांना शालेय, महाविदयालयीन, व्यवसायिक शिक्षणाचे धडे गिरवण्यासाठी दररोज दापोलीत यावे लागते. या महत्वाच्या मार्गावरच दाभोळ येथील भुयारातील चंडीका देवी मंदिर देवस्थान, सुप्रसिध्द ऐतिहासिक दाभोळ बंदर, लोकमान्य टिळकांचे मुळ गावी चिखलगावला जाण्यासाठी तसेच गुहागर तालूक्याकडे जाण्याचा हा दापोलीतील ऐकमेव असा मार्ग आहे. त्यामुळे या मार्गावर तसे कायमच पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांच्या वर्दळीचा राबता असतो. अशा या व्यापारउद्दीम, पर्यटनदृष्टया आणि प्रवासी वाहतुकीच्यादृष्टीने अतिशय महत्वाच्या मार्गावर उंबर्ले हद्दीतील रस्त्यावर खड्डे पडले आहेत ते पडलेले खड्डे बुजवून रस्ता वाहतुकयोग्य करणे गरजेचे आहे.
शासनाने विकासाच्या नावाने जाहीरातीसाठी वारेमाप खर्च करून विकासाचा आभास निर्माण करण्यापेक्षा दापोली दाभोळ मार्गावरील रस्त्यातील खड्डे बूजवून प्रवासी तसेच व्यवसायिक वाहतुक सुरळीत होण्यासाठी अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजवण्यासाठीची त्वरेने तत्परता दाखविलीच नाही तर जनहितासाठी सामाजिक भावनेने आपल्याला आंदोलन छेडावे लागेल. आंदोलन छेडताना कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाच तर त्याची सारी जबाबदारी ही सार्वजनिक बांधकाम विभागावर राहील अशाप्रकारचा इशारा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे जालगाव विभागाचे विभाग प्रमुख शैलेश पांगत यांनी दिला आहे.