
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पुढील सत्रातील वर्गही ऑनलाइन घेण्याचा निर्णय पवई येथील आयआयटी मुंबईने घेतला आहे. पीएचडी, बी. टेक. आणि एम. टेकच्या विद्यार्थ्यांनाच संशोधन कार्यासाठी पॅम्पसमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. अन्य विद्यार्थ्यांचे वर्ग हे पूर्णपणे ऑनलाइन होतील, असे आयआयटी मुंबईने जाहीर केले आहे.
गेल्या वर्षी 28 मार्चपासून आयआयटी मुंबईतील वर्ग कोरोनामुळे बंद करण्यात आले होते. उन्हाळी सुट्टीही लवकरच 1 एप्रिलपासून सुरू करण्यात आली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण सत्र ऑनलाइन घेण्यात येईल असे 25 जून रोजी जाहीर करण्यात आले. येत्या 26 जुलैपासून पदवीपूर्व बी. टेक. अभ्यासक्रमाच्या पहिल्या सत्राला सुरुवात होत आहे. ते सत्र पूर्णपणे ऑनलाइन असेल, असे आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. सुभाशिष चौधरी यांनी जाहीर केले आहे.
कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर गेल्या डिसेंबरपासून विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने पॅम्पसमध्ये बोलवण्यात आले होते. त्याची सुरुवात पीएचडी करणारे तसेच संशोधन कार्यात असलेल्या विद्यार्थ्यांपासून करण्यात आली होती. कारण त्यांना संशोधनासाठी प्रयोगशाळेची गरज होती. त्यातही ज्यांना प्रयोगशाळेत काम करण्याची आत्यंतिक गरज आहे त्यांनीच पॅम्पसमध्ये यावे असेही स्पष्ट करण्यात आले होते. प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश देतानाही कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करण्यात येत आहे. सध्या कॅम्पसमध्ये तीन हजार विद्यार्थी असून त्यांचे लसीकरण प्राधान्याने करण्यात येत आहे.

























































