
वीजग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीची रक्कम भरण्यास महावितरणकडून सहा मासिक हप्त्यांची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच ग्राहकांचा सरासरी वीजवापर कमी झाला असल्यास सुरक्षा ठेवीमधील जादाची रक्कमही त्यांच्या वीज बिलामध्ये समायोजित केली जाणार आहे.
महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या (एमईआरसी) निर्देशानुसार वीजग्राहकांकडून सुरक्षा ठेव आकारण्यात येते. दरवर्षी सुरक्षा ठेवीची पुनर्गणना करण्यात येते व त्यानुसार आर्थिक वर्ष संपल्यानंतर ग्राहकांच्या मागील एका वर्षातील सरासरी वीजवापराच्या आधारे नवीन सुरक्षा ठेवीची रक्कम निश्चित करण्यात येते. याआधी जमा असलेली सुरक्षा ठेव व वीजवापरानुसार नव्याने निर्धारित करण्यात आलेली सुरक्षा ठेव यांच्यातील फरकाची रक्कम भरण्यासाठी स्वतंत्र बिल देण्यात येते. सदरची रक्कम भरण्यासाठी सहा मासिक हप्त्यांची सोय उपलब्ध करून देण्यात आल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. दरम्यान, ग्राहकांनी भरलेल्या सुरक्षा ठेव रकमेवर आरबीआयच्या निर्देशानुसार व्याज दिले जात असल्याचेही स्पष्ट केले आहे.






























































