कुठे, कधी, किती वेळासाठी वीज जाणार? कर्मचारी-अधिकाऱ्यांनी माहिती देणे बंधनकारक

618

कुठल्या विभागातील वीज कधी, किती वेळासाठी जाणार याची माहिती न देणे आता संबंधित वीज कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या चांगलेच अंगाशी येणार आहे. तांत्रिक कामासाठी वीज कर्मचाऱ्यांकडून वीजपुरवठा खंडित (ब्रेक डाऊन) केला जातो. त्यामुळे वीज पुरवठा कधी सुरळीत होणार हे त्यांना माहीत असते. पण ते ग्राहकांपर्यंत न पोहोचल्याने त्यांची मोठी गैरसोय होते. ती टाळण्यासाठी नियोजित कामाकरिता कधी वीज पुरवठा बंद राहणार हे मोबाईल ऍपच्या माध्यमातून सर्व्हरला कळवल्यास त्याच्या आगाऊ माहितीचे एसएमएस ग्राहकांना जात, पण कर्मचाऱ्यांकडून ही माहिती देण्यास टाळाटाळ होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

दोन कोटी ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकाची महावितरण कंपनीकडे नोंद आहे. एखाद्या नियोजित कामासाठी वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार असेल तर त्यांची माहिती एक दिवस आधी ग्राहकांना सर्व्हरच्या माध्यमातून एसएमएसने पाठवली जाते.  मात्र अनेक अधिकारी-कर्मचारी वीज पुरवठा खंडित होण्याबाबतची माहिती मोबाईल ऍपवर अपडेट करत नाहीत. त्यामुळे ग्राहकांना कोणतीही पूर्वसूचना न देताच वीज पुरवठा खंडित होत असल्याने सर्वसामान्य ग्राहकांबरोबरच औद्योगिक, वाणिज्य ग्राहक नाराजी व्यक्त करतात. त्यामुळे वीज पुरवठा बंद राहण्याबाबतची माहिती सर्व्हरला न पोहोचवल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश विभागीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.

काम होताच तत्काळ वीज पुरवठा पूर्ववत होणार

वीज कर्मचारी अनेक तांत्रिक कामांसाठी वीज उपकेंद्रातून ब्रेक डाऊन होतात. त्यामुळे सदर काम ठरलेल्या वेळेत पूर्ण करून वीजपुरवठा पूर्ववत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच वीज वाहिन्यांवर होणारे बिघाड वेळेत दुरुस्त करून ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा देण्याबाबतचेही निर्देश दिले आहेत.

 

आपली प्रतिक्रिया द्या