
अमेरिका आणि इस्रायलसोबत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांना सत्तेतून पूर्णपणे बाजूला सारून इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) देशाचे नियंत्रण आपल्या हातात घेतले आहे. ‘इराण इंटरनॅशनल’ने प्रसिद्ध केलेल्या एका खळबळजनक अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
आयआरजीसीने देशाचा कारभार चालवण्यासाठी वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक मिलिटरी परिषद स्थापन केली आहे. आता देशाचे सर्व महत्त्वाचे निर्णय ही परिषदच घेत असून राष्ट्राध्यक्षांचे अधिकार संपुष्टात आले आहेत. इतकेच नाही तर, सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांच्यापर्यंत देशातील खरी परिस्थिती पोहोचू दिली जात नसल्याचा दावाही या अहवालात करण्यात आला आहे.
अहमद वाहिदी बनले सर्वेसर्वा
मोहम्मद पाकपौर यांच्या मृत्यूनंतर आयआरजीसीची सूत्रे हाती घेतलेले कमांडर अहमद वाहिदी सध्या इराणचे सर्वेसर्वा बनले आहेत. पेझेश्कियान यांनी गुप्तचर विभागाच्या मंत्रिपदासाठी केलेली निवड वाहिदी यांनी दबावाखाली रद्द करण्यास भाग पाडले. सर्व संवेदनशील माहिती आणि निर्णय प्रक्रियेवर आता वाहिदी आणि त्यांच्या लष्करी सहकाऱ्यांचे वर्चस्व आहे.
या अंतर्गत सत्तासंघर्षादरम्यान इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी सध्या कुठे आहेत, याबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही सूत्रांनुसार त्यांचा मृत्यू झाला आहे, तर काही दाव्यांनुसार ते कोमात असून रशियामध्ये उपचार घेत आहेत. गेल्या काही दिवसांत त्यांनी कोणतेही थेट संबोधन केलेले नाही, ज्यामुळे संशय अधिक बळकट झाला आहे.



























































