पोलीस डायरी – हौसिंग डॉट कॉम जोरात; फसव्या जाहिरातींचे बळी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रभाकर पवार, [email protected]

दहा टक्के कोट्यातून सरकारने घरे देणे बंद केले तरी सरकारी कोट्यातून स्वस्तात घरे मिळवून देतो, अशी बतावणी करून गरजूंना फसविणाऱ्या टोळ्या मुंबईत आजही सक्रिय आहेत. इमारतीचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे, बिल्डरला पैशांची नितांत गरज आहे, तो सरकारने ठरविलेल्या दराने (रेडीरेकनर) स्वस्तात फ्लॅट विकत आहे असे सांगून फसविणाऱ्या टोळ्या आपणास मिनिटागणिक मुंबईत दिसतील. १) प्रिंट माध्यम (वृत्तपत्र), २) डिजिटल माध्यम (सोशल मीडिया: फेसबुक, इन्स्टाग्राम, वेबसाईट, सर्च इंजिन (गुगल), ई-मेल, मोबाईल अॅप्स), ३) बाह्य माध्यम (होर्डिंग्ज, बॅनर्स, पोस्टर्स, साईन बोर्डस्, बसेस, रिक्षा), ४) इतर माध्यम चित्रपटगृहे, जाहिरात फलक आदी माध्यमांतून जाहिराती प्रकाशित करून तर अलीकडे मोठ्या प्रमाणात लोकांची फसवणूक केली जात आहे.

अलीकडे घरे खरेदी-विक्रीच्या हौसिंग डॉट कॉम या वेबसाईटवर मालाड (पश्चिम) येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतींची छायाचित्रे अपलोड करून स्वस्तात फ्लॅट मिळतील, अशी जाहिरात एका टोळीने केली. दीड कोटी रुपये किंमत असलेला फ्लॅट एक कोटी रुपयांत मिळेल असेही जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आले होते. मालाडमध्ये स्वस्तात फ्लॅट मिळत असल्याची जाहिरात वेबसाईटवर पाहून नवलदेव राजपूत या इसमाने संपर्क साधला. कुणातरी एका बड्या इन्व्हेस्टरला आपला फ्लॅट विकून परदेशात जायचे आहे. तुम्ही त्वरा करा नाहीतर स्वस्त फ्लॅट मिळायची तुमची संधी निघून जाईल, असे वेबसाईटवर नमूद करण्यात आलेल्या फोनवर संपर्क साधल्यावर राजपूतला सांगण्यात आले. राजपूतने फ्लॅटची ऑफर देणाऱ्या इसमाची भेट घेतली. कागदपत्रे तपासली. जी व्यक्ती फ्लॅट विकणारी होती त्या व्यक्तीचा फोटो करारनाम्यावर पाहिला आणि सौदा पक्का केला. ३० लाख रुपये अॅडव्हान्स दिले. पैसे मिळाल्यानंतर पैसे घेणारी टोळी गायब झाली. मालाड पश्चिम झकारिया रोड येथील शुभ्रश्री आर्केड येथील १३०१ क्रमांकाचा फ्लॅट भामट्यांनी नवलदेव राजपूतला दाखविला होता, परंतु तो एका वृद्ध व्यक्तीच्या नावावर असल्याचे आढळून आले. राजपूतला फ्लॅट मालक म्हणून जी व्यक्ती भेटली ती बोगस होती. खोटी करारपत्रे दाखवून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर राजपूतने मालाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. चव्हाण यांच्याकडे धाव घेतली. चव्हाण यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश बागल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय बेंडवाल, दीपक रायवाडे, निळोबा जक्कलवाड, जुवाटकर, फर्नांडिस, गोंजारी, वाघ, शेरे, राणे, बाबर या आपल्या पथकाला सोबत घेऊन तपास केला व ५ जणांच्या एका टोळीला डिसेंबर अखेरीस अटक केली. स्वस्तात फ्लॅट देतो असे सांगून वेबसाईटवर जाहिरात देऊन फसवणूक करणाऱ्या या हौसिंग डॉट कॉम टोळीने मुंबई व मीरा-भाईंदर आदी परिसरातील गरजूंना मोठ्या प्रमाणात फसविले असल्याचे तपासात उघड झाले आहे.

आजच्या डिजिटल युगात जाहिरात ही केवळ उत्पादनांची माहिती देण्याचे साधन राहिलेले नाही तर अनेकांच्या फसवणुकीचे प्रभावी हत्यार बनत चालले आहे. वेगवेगळ्या माध्यमांतून सर्वसामान्य नागरिकांची दिशाभूल आर्थिक फसवणूक केली जात आहे. जाहिरातींमधून खोटी, अर्धसत्य माहिती, अतिरंजित दावे केले जातात. ‘१० दिवसांत दुप्पट पैसे।’ ‘परदेशात
हमखास नोकरी!’ ‘मधुमेह, कॅन्सर, लठ्ठपणा यावर जालीम उपाय!’ या व अशा पद्धतीच्या जाहिराती प्रकाशित करून लोकांना फसविले जाते. फसव्या जाहिराती ही केवळ आर्थिक फसवणूक नसून ती सामाजिक आरोग्याला लागलेली कीड आहे. अशा जाहिरातींवर विचार न करता विश्वास ठेवणे म्हणजे फसवणुकीला आमंत्रण देण्यासारखेच आहे.

वाढत्या बेरोजगारीमुळे तरुण मुलंही मोठ्या प्रमाणात फसत आहेत. त्यांना पैसे घेऊन परदेशात नोकरीसाठी पाठविले जाते. परंतु म्यानमारसारख्या देशात पासपोर्ट जप्त करून त्यांना कॉलसेंटरमध्ये सायबर फ्रॉड करण्यासाठी बसविले जाते. अमेरिका, कॅनडामध्ये बनावट कागदपत्रे तयार करून तरुणांना पाठविले जाते, परंतु कॅनडातून अमेरिकेची हद्द ओलांडताना भारतीय पकडले जातात. सोशल मीडियामधील फसव्या जाहिरातींमुळे लोक देशोधडीला लागत आहेत, परंतु यावर कुणाचेच नियंत्रण नाही. अज्ञानाचा फायदा चोर-लफंगे घेत आहेत. वर्तमानपत्रातील, सोशल मीडियातील जाहिराती हे सापळे आहेत. आकर्षक व विश्वासार्ह वाटणाऱ्या जाहिराती अनेकांच्या जिवावर बेतत आहेत. फेसबुक, व्हॉटस्अॅप, इन्स्टाग्राम, यूट्यूबवरील जाहिराती वेगाने फॉरवर्ड व शेअर होतात आणि अनेकांची आयुष्ये उ‌द्ध्वस्त होतात.

आपणास कर्ज हवे असल्यास इन्स्टावर अॅप डाऊनलोड करा अशी जाहिरात सोशल मीडियावर करून सायबर माफियांनी (चायनामध्ये बसलेल्या) आपल्या देशातील हजारो लोकांना देशोधडीला लावले आहे. आपल्या देशात fake loan apps सक्रिय आहेत. झटपट कर्ज देण्याचे वायदे करतात, पैसे खात्यात जमा करतात, परंतु नंतर जास्त व्याज आकारून कर्ज घेणाऱ्याला परतफेडीसाठी सळो की पळो करून सोडतात. डिजिटल युगात वर्तमानपत्रे, न्यूज पोर्टल्स आणि सोशल मीडिया ही माहितीची प्रभावी साधने आहेत, परंतु याच माध्यमांचा गैरवापर करून नागरिकांना फसविले जात आहे, त्यांचे बळी घेतले जात आहेत.