प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलातील निशांत हिंदुस्थानच्या जिम्नॅस्टिक्स संघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विलेपार्लेमधील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संपुलातील निशांत करंदीकर याची हिंदुस्थानच्या ज्युनियर जिम्नॅस्टिक्स संघात निवड झाली आहे. तसेच शुभम गिरी यांची हिंदुस्थानी जिम्नॅस्टिक्स ज्युनियर संघाच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे.

जपान येथे आगामी दिवसांत जागतिक जिम्नॅस्टिक्स चॅम्पियनशिपचे (सीनियर) आयोजन करण्यात येणार आहे. तसेच बांगलादेश येथील ढाकामध्ये मध्य-दक्षिण आशियाई जिम्नॅस्टिक्स चॅम्पियनशिप (ज्युनियर व सीनियर) 26 ऑक्टोबरपासून खेळविण्यात येणार आहे. या दोन्ही स्पर्धांसाठी निवड चाचणी शिबीर नवी दिल्ली येथे पार पडले. यामधून हिंदुस्थानी संघाची निवड करण्यात आली.

गुरू-शिष्य एकाच स्पर्धेत खेळणार

प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचे प्रशिक्षक विशाल कटकदौड व नीलम बाबरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली निशांत करंदीकर गेली आठ ते दहा वर्षे जिम्नॅस्टिक्सचे बारकावे आत्मसात करीत आहे. तसेच आता या खेळातील पुढचे प्रशिक्षण तो या संपुलात रुजू झालेले शुभम गिरी यांच्या देखरेखीखाली पूर्ण करीत आहे. शुभम गिरी व निशांत करंदीकर ही गुरू-शिष्य जोडी एकाच स्पर्धेत सहभागी होणार आहे. या जोडीकडून पदक जिंकण्याच्या आशा बाळगल्या जात आहेत. दोघांच्या निवडीनंतर संकुलाचे अध्यक्ष अरविंद प्रभू, कार्यवाह मोहन राणे, मुख्याधिकारी प्रीतम केसकर यांनी आनंद व्यक्त केला.

मुलांच्या गटातील पहिलाच

निशांत करंदीकर हा प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संपुलात प्रशिक्षण घेणारा आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करणारा मुलांच्या गटातील पहिलाच खेळाडू ठरला आहे. याआधी या संकुलातून वंदिता रावल, द्विजा आशर, श्रावणी वैद्य, उर्वी अभ्यंकर, अनुष्का पवार या मुलींनी हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व केले आहे.