
दैनंदिन जीवनातील एक अत्यंत महत्त्वाची आणि परवडणारी वस्तू जर हजारो रुपयांना विकली जाऊ लागली तर नक्कीच तुमलाही आश्चर्याचा धक्का बसेल. महिलांच्या अॅक्सेसरी किटमधील सर्वात महत्त्वाचा भाग असलेली सेफ्टी पिन (Safe Pin) सध्या फॅशन जगतात चर्चेत आहे. कारण, इटालियन लक्झरी फॅशन ब्रँड प्राडा (Prada) ने एक साधी सेफ्टी पिन ब्रोच म्हणून इतक्या अवाढव्य किंमतीत बाजारात आणली आहे. या पिनची किंमत ऐकून तुम्हालाही धक्काच बसेल. 10 रुपयांना मिळणारी सेफ्टी पिन प्राडा चक्क 69 हजारांना विकत आहे.
साड्या, ड्रेप्स किंवा ओढण्या अगदी व्यवस्थितपणे सांभाळण्यासाठी वापरली जाणारी सेफ्टी पिन ही मार्केटमध्ये 10 रुपयांना मिळते. अवघ्या १० ते २० रुपयांत २०-२५ पिनचा गठ्ठा असतो. ही लहान वस्तू प्रत्येक हिंदुस्थानी महिलेच्या हँडबॅगमध्ये किंवा बांगडीला अडकवलेली आढळते. मात्र हीच पिन आता एका मोठ्या ब्रॅंडच्या नावाने 69 हजारांना विकली जातेय. त्यामुळे या पिनची सध्या प्रचंड चर्चा होतेय.
View this post on Instagram
लक्झरी फॅशन ब्रँड प्राडाने याच साध्या सेफ्टी पिनचे रूपांतर एका फॅशन अॅक्सेसरीमध्ये केले आहे. ‘निटेड-थ्रेड’ (Knitted-thread) डिझाईन आणि त्यावर प्राडाचा छोटासा आकर्षक लोगोही लावला आहे. याची किंमत 775 डॉलर्स इतकी आहे. म्हणजेच हिंदुस्थानी चलनानुसार, 69 हजार रुपयांना हे पिन मिळणार आहे. त्यामुळे ही पिन विकत घेणे सामान्य जनतेला परवडणारी नाही.
प्राडाची ही पिन व्हायरल झाल्यामुळे अनेकांनी त्याची खिल्ली उडवली आहे. एका युजरने लिहिलेय की, माझ्या आजीने यापेक्षा चांगली पिन तयार केली असती. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले की या एका पिनसाठी मी फक्त दीड रुपया देईन. प्राडाची ही पिन हरवल्यास तिचे दुःख मोठे असेल आणि तिच्या सुरक्षेसाठी विमा काढावा लागेल, अशी विनोदी प्रतिक्रिया लोक व्यक्त करत आहेत. लक्झरी ब्रँड्स वस्तूंच्या डिझाइन आणि नावाच्या बळावर कितीही महागड्या किंमती आकारू शकतात, याचे हे एक अचंबित करणारे उदाहरण आहे.
































































