
अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा मुद्या ऐरणीवर आला आहे. मात्र, या निर्णयाच्या सुरुवातीपासून विरोधात असणारे अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी आता भाजपच्या दिल्लीतील नेत्यांच्या मदतीने विलीनीकरणात खो घालण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी पटेल यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची चर्चा आहे.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत मागील काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. 12 फेब्रुवारीला यासंदर्भातील निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती चार दिवसांपूर्वी शरद पवार यांनीच पत्रकार परिषदेत दिली होती. पवार कुटुंबात याबाबत एकमत झाले असले तरी या निर्णयामुळे आपले राजकीय
अस्तित्वच संपण्याच्या भीतीने काहीजण कामाला लागले आहेत. प्रफुल्ल पटेल हे त्यात आघाडीवर आहेत. याचसंदर्भात पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे.
शरद पवारांना एनडीएसोबत आणा, असा आग्रह सुरुवातीपासूनच मोदी व शहा यांचा राहिला आहे. मात्र, अजित पवारांना ते जमले नाही. आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर आपले अस्तित्वच राहणार नाही. त्यामुळे पटेलांनी विलीनीकरणाला कडाडून विरोध दर्शविला आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीचे काही खासदार मी गळाला लावतो, असा शब्द पटेलांनी या भेटीत दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
अमित शहा यांनी गोयलांना झापले
अजित पवार गटाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल यांची निवड होणार असल्याची माहिती परस्पर जाहीर केल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केंद्रीय वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांना झापले. जनतेत चुकीचा संदेश जाईल अशी वक्तव्ये करू नका, असे शहा यांनी त्यांना बजावले.


























































