
हिंदुस्थानचा ग्रॅण्डमास्टर आर. प्रज्ञानंद याने अमेरिकेतील लास वेगास येथे सुरू असलेल्या फ्रीस्टाईल बुद्धिबळ ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत अव्वल मानांकित नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनला अवघ्या 39 चालींत पराभूत करीत एक देदीप्यमान विजय मिळविला.
पाच वेळच्या जगज्जेत्या कार्लसनने 19 वर्षीय प्रज्ञानंदला स्पर्धेत आधीच्या फेरीत हरविले होते. या स्पर्धेत प्रत्येक खेळाडूला 10 मिनिटांचा वेळ व प्रत्येक चालीसाठी 10 सेपंद अतिरिक्त वेळ दिला जातो. कार्लसनला नुकतेच हिंदुस्थानच्या जगज्जेत्या डी. गुकेशनेही दोनदा हरविले होते. प्रज्ञानंदने कार्लसनविरुद्ध चौथ्या फेरीत विजय मिळवित 8 खेळाडूंच्या या स्पर्धेत 4.5 गुणांसह संयुक्तपणे आघाडी घेतली आहे. शिवाय या विजयासह प्रज्ञानंदने कार्लसनला बुद्धिबळाच्या क्लासिकल, रॅपिड व ब्लिट्ज या तिन्ही प्रकारांत हरविण्याचा पराक्रम केला, हे विशेष.
स्पर्धेत आतापर्यंत अजेय असलेल्या प्रज्ञानंदने चारपैकी तीन लढती जिंकल्या असून एक लढत ड्रॉ केली आहे. या हिंदुस्थानी खेळाडूने उझबेकिस्तानच्या नोदिरबेक अब्दुसत्तोरोवविरुद्ध ड्रॉ खेळून स्पर्धेची सुरुवात केली. त्यानंतर प्रज्ञानंदने दुसऱया फेरीत असाउबायेवा याचा, तर तिसर्या फेरीत कीमरला हरविले. हीच विजयी मालिका कायम ठेवत प्रज्ञानंदने चौथ्या फेरीत कार्लसनलाही पराभवाचा धक्का दिला.