
सामना प्रतिनिधी । मुंबई
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दलित समाजाची मते मिळवण्यासाठी आता काँग्रेस पक्षाने अकोल्यात भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. तर दुसरीकडे लोकतांत्रिक जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष कपिल पाटील यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पत्र पाठवून प्रकाश आंबेडकर यांच्याशिवाय महाआघाडीला पूर्ण स्वरूप येऊ शकणार नाही असे स्पष्ट केले आहे.
राज्यात दलित व मुस्लिम मतांचे विभाजन टाळण्यासाठी ‘एमआयएम’ पक्षाचे असदुद्दीन ओवेसी व प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघाने युती करून राज्यात एकत्रित निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. यामुळे खासकरून काँग्रेस पक्षाला मोठा फटका बसणार हे स्पष्ट आहे. परिणामी प्रकाश आंबेडकर यांनी महाआघाडीत सहभागी होण्यासाठी काँग्रेसने प्रस्ताव ठेवला होता. पण प्रकाश आंबेडकर यांनी नकार देत एमआयएमशी युती कायम ठेवण्याचा निर्धार केला. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीत अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा देण्याची खेळी काँग्रेसने खेळण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे मुस्लिम व दलित मतांचे विभाजन टाळेल व त्याचा फायदा काँग्रेसला होईल अशी अटकळ आहे; पण प्रकाश आंबेडकर यांनी यावर अजून तरी कोणताही निर्णय घेतलेला नाही.
महाआघाडीला पूर्ण स्वरूप नाही
तर दुसरीकडे लोकतांत्रिक जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष कपिल पाटील यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते अजित पवार यांना पत्र पाठवून महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर यांच्याशिवाय महाआघाडीला पूर्ण स्वरुप येऊ शकणार नाही असे नमूद केले आहे. प्रकाश आंबेडकर व राजू शेट्टी यांना एक-एक जागा सोडली व अन्य पक्षांना विधानसभेत एक जागा सोडण्याचे आश्वासन देऊन महाआघाडी झाली असे मानत असाल तर वास्तवापासून आपण खूप दूर आहात, असा टोलाही कपिल पाटील यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला मारला आहे.
























































