सरसकट आरक्षणाला विरोधच, सरकारलाही खाली खेचू; प्रकाश शेंडगे यांचा इशारा

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याऐवजी स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे. अन्यथा ओबीसी समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करील, सरकारने सरसकट आरक्षणाचा निर्णय घेतल्यास, 2024 मध्ये या सरकारला खाली खेचू, असा इशारा ओबीसी जनमोर्चाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी धाराशिव येथील पत्रकार परिषदेत दिला.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन पुकारले आहे. परंतु, ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे म्हणून ओबीसी जनमोर्चाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात बैठका, सभा घेण्यात येत आहेत. धाराशिव येथे आज रविवारी शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश शेंडगे यांनी ओबीसी समाजाची बाजू मांडली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्रात काढण्यात आलेल्या 58 मोर्चांमध्ये ओबीसी समाजही सहभागी झाला होता. हे लक्षात घेऊन ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी आमची मागणी असल्याचे शेंडगे म्हणाले.

यापूर्वी सरकारने दोन वेळा मराठा समाजाला आरक्षण लागू केले, मात्र सर्वोच्च न्यायालयात ते टिकले नाही. सध्या न्या. िंशदे यांच्या नेतृत्वाखालील समितीमार्फत कुणबी दाखल्याची नोंद तपासली जात आहे. आधीच ओबीसी सामाजातील पावणेचारशे जाती २७ टक्के आरक्षणात असताना आणखी जातींचा समावेश झाल्यास ओबीसींच्या हक्काचे आरक्षण हिरावून घेतले जाणार आहे. म्हणून ओबीसी समाजाचे आरक्षण अबाधित ठेवून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी आमची भूमिका असल्याचे ते म्हणाले.

बीडमधील हिंसाचाराचा मास्टर माईंड पोलिसांना सापडत नसेल तर, आरोपींना आमच्या हवाली करावे. आम्ही स्वतः या लोकांना शोधून दाखवतो. तसेच, सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास आमचा कायम विरोध आहे. जर, सरकारने तसा जीआर काढल्यास आम्ही न्यायालयात जाणार आहोत. सोबतच, 2024 ला सरकारला खाली खेचू, असा इशारा देखील प्रकाश शेंडगे यांनी दिला. तसेच, अंबडपेक्षा मोठा मेळावा हिंगोली येथे होणार असल्याचा दावा शेंडगे यांनी केला आहे.

आतापर्यंत सरकारमध्ये मुख्यमंत्री, मंत्री, आमदार मराठा समाजाचे असताना त्यांच्यावर अन्याय कोणी केला, हे लक्षात घेऊन ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता समाजाला आरक्षण द्यावे, अन्यथा ओबीसी समाज सरकारला येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देईल, असेही ते म्हणाले.