
>> प्रल्हाद जाधव
भारतातील नद्या हा संस्कृती-संस्कार यासोबतच जिव्हाळ्याचा विषय आहेत. जगभरातील संस्कृती नदीच्या कुशीत उगम पावल्या आणि तिच्या प्रवाहासोबत फुलल्या. भारतातील ही नदीसंस्कृती अनुभवताना तिच्या सान्निध्यात घालवलेल्या क्षणांची ही उजळणी.
मी भारतातील अनेक लहान-मोठय़ा नद्या पाहिल्या आहेत. त्यांच्या काठाने फिरलो आहे. त्यांच्या काठी वस्तीस राहिलो आहे. त्यांचे पाणी प्यायलो आहे. त्यांचे उगम पाहिले आहेत. संगम पाहिले आहेत. संगमांवर रेंगाळलो आहे. त्यातून जलविहार केला आहे.
श्रीनगरजवळ वेरीनाग येथून उगम पावणारी झेलम, लडाखमधून भारतात प्रवेश करणारी सिंधू मी पाहिली आहे. केरळमधील पेरियार, गोव्यातील मांडवी नदी पाहिली आहे. मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रातून पूर्व-पश्चिम वाहणारी नर्मदा मी पाहिली आहे. रावी, चिनाब, झेलम, सतलज, गंगा, यमुना या नद्या पुन पुन्हा पाहिल्या आहेत. आसामातील ब्रह्मपुत्रा ही देशातील सर्वात मोठी नदी. भारत-बांगलादेश सीमेवरील डावकी नदी पाहिली आहे. स्वच्छ तळ हे तिचे वैशिष्टय़! कर्नाटकातील थलकावेरी येथून निघणारी कावेरी, भीमाशंकर येथून निघणारी भीमा, ब्रह्मगिरीवरून निघणारी गोदावरी अशा अनेक नद्यांचे उगम पाहिले आहेत. महाबळेश्वर येथून उगम पावणाऱया कृष्णा, वेण्णा, कोयना, गायत्री, सावित्री ऊन, पाऊस, थंडीत जवळून पाहिल्या आहेत. कृष्णा, कोयना आणि सोळशी यांचा तापोळा येथील त्रिवेणी संगम डोळे भरून पाहिला आहे. कराडला कृष्णा-कोयनेच्या संगमावर चिंब रेंगाळलो आहे. गडचिरोली जिह्यातील भामरागड येथील पर्लकोटा नदीकाठी, मेळघाटातील कोलखास येथील सिपना नदीच्या काठी भटकंती केली आहे, मुक्कामी राहिलो आहे.
कावेरी, नर्मदा, गोदावरी, तापी अशा नद्या पुन पुन्हा मी जवळून पाहिल्या आहेत. उजनी आणि कोयनेच्या विशाल जल सान्निध्यात बराच वेळ राहिलो आहे. नद्यांचे उगम कोरडे कसे पडतात हेही पाहिले आहे. भीमाशंकराच्या देवळामागून होणारा भीमेचा उगम हे त्याचे एक उदाहरण! कर्नाटकात सोमेश्वर बीचवर बैंदूर नदी आणि अरबी समुद्राचा संगम पाहिला आहे. कन्याकुमारी येथे तीन, तर धनुषकोडी येथे दोन महासागरांचा संगम पाहिला आहे.
उत्तराखंडमध्ये भागीरथी आणि अलकनंदेच्या मीलनातून गंगेचा उगम कसा होतो आणि तेथील लाल व हिरव्या रंगाचे पाणी एकमेकांना मिठीत कसे घेते ते पाहिले आहे.
लडाखमध्ये बास्पा आणि झंस्कार या नद्यांचा रोमहर्षक संगम पाहिला आहे. लेहजवळ झंस्कार नदीच्या काठी ‘वजा तीस अंश सेल्सिअस’ तापमानात दोन रात्री तंबूमध्ये मुक्काम केला आहे. अशाच थंडीत युमथांग व्हॅलीत झिरो पॉइंट येथे तिस्तेच्या धारेत हात घालून हाडापर्यंत शिरणाऱया थंडीचा थरार अनुभवला आहे.
हिमालयात ‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’ला जाताना पहिले तीन दिवस नेपाळमधील दूधकोशी नदीच्या सान्निध्यात राहण्याचे भाग्य मला मिळाले आहे. हिमालयात धौलीगंगेच्या काठी तंबूत मुक्काम ठोकला आहे. हिमनद्यांचा जन्म कसा होतो तेही अगदी जवळून जाणून घेतले आहे.
मात्र इतके सारे असले तरी कुठेही गेलो तरी माझ्या गावची- पोलादपूरची सावित्री मी कधीही विसरू शकत नाही. ती जणू माझ्यातून सतत वाहत असते, सळसळत असते, माझ्या लेखनातून आविष्कृत होत असते. इतर नद्यांच्या तुलनेत सावित्री ही जलद गतीने वाहत समुद्राला मिळणारी नदी. हे तिचे महात्म्य आणि पुराणातील तिचा ‘क्रांतिकारी स्वभाव’ लक्षात घेता ती नावारूपाला यायला हवी होती. तिची परिक्रमासुद्धा लोकप्रिय ठरू शकली असती, पण तिच्यावर जेवढे अत्याचार झाले तेवढे देशातील कोणत्याच नदीवर झाले नसतील. आजही तिच्यातून वाळूचा उपसा होतो. तिच्यात विषारी पाणी सोडले जाते. महाडजवळ ही नदी खाडीला मिळते. त्या भागातील पाणी रक्तासारखे लाल आणि मृतप्राय दिसते.
मी जेव्हा जेव्हा पोलादपूरला जातो आणि सावित्रीच्या काठावर बसून तिच्या पाण्यात हात घालतो तेव्हा तेव्हा येथील मासे धावत येतात आणि माझ्याशी सलगी करू लागतात. माझ्याशी जणू हस्तांदोलन करू पाहतात. हा अनुभव मला रोमांचित करून टाकतो. दोन्ही किनारे फुलवत-फळवत, कचरा दोन्ही किनाऱयावर फेकून देत मधल्या धारेने झुळझुळत राहणे हा नदीचा धर्म! दुःख, समस्या, अडचणी किनाऱयावर फेकून देत आपणही निर्मळपणे वाहत राहिले पाहिजे, अशी प्रेरणा नद्या कायम देत असतात.
या सगळ्या अनुभवासंबंधी यथाशक्ती लिहिले आहे. मात्र नद्यांवर केवळ कथा, कविता, कादंबऱया लिहीत बसण्यापेक्षा त्यांच्या दुर्दशेच्या विरोधात उभे राहणे ही काळाची गरज आहे हेही मला कळते आणि आपण काहीच केले नाही तर संतापलेल्या नद्या माणसाला त्याची जागा कशी दाखवतात हे आपण पाहतच असतो की! म्हणूनच आपलं अस्तित्व नदीच्या अस्तित्व तिच्या अस्तिवाशी जोडले गेले आहे हे आपल्याला उमगायला हवं.