माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी कोरोना पॉझिटिव्ह, आर्मी रुग्णालयात व्हेंटिलेटरवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. मुखर्जी यांनी स्वतः ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. त्यांना दिल्लीत आर्मी रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे.

किरीट सोमय्यांनाही कोरोना

भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांची पत्नी मेधा सोमय्या या दोघांचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सोमय्यांनी स्वत: ट्विट करून ही माहिती दिली आहे. ‘मी आणि माझी पत्नी मेधा सोमय्या कोरोना बाधित झालो असून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु करण्यात आले आहेत’ असे त्यांनी म्हटलं आहे.

देशात कोरोनाचे 62,064 नवे रुग्ण

देशात सोमवारी कोरोनाचे 62,064 नवीन रुग्ण आढळले, तर 1007 जणांचा महामारीत मृत्यू झाला. सलग चौथ्या दिवशी 60 हजारांहून अधिक नवीन कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 22 लाख 15 हजार 75 वर गेली आहे. त्याचबरोबर कोरोनाबळींचा आकडा 44 हजार 386 झाला आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सोमवारपर्यंत 15 लाख 35 हजार 744 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. देशात सध्या कोरोनाचे 6 लाख 34 हजार 945 इतके ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. रविवारपर्यंत कोरोनाचे एकूण 2 कोटी 45 लाख 83 हजार 558 नमुने तपासण्यात आले. यातील 4 लाख 77 हजार 23 नमुने रविवारी एका दिवसात तपासण्यात आले, असे आयसीएमआरने जाहीर केले.

महाराष्ट्रात 1 लाख 47 हजार 735 कोरोना रुग्णांवर उपचार

राज्यातील कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दिवसभरात 6711 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत एकूण 3 लाख 58 हजार 421 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 68.33 टक्क्यांवर पोहोचले आहे. 9,181 नवीन रुग्णांची नोंद झाली असूने सध्या 1 लाख 47  हजार 735 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात सोमवारी 293 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

मुंबईत सोमवारी 925 नवे रुग्ण, 46 जणांचा मृत्यू

मुंबईत सोमवारी कोरोनाचे 925 नवे रुग्ण सापडले असून गेल्या 48 तासांत 46 जणांचा मृत्यू झाला आहे तर गेल्या 24 तासांत 1,407 जण कोरोनामुक्त झाले असून मुंबईत एकूण कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या आता 97 हजार 993 वर पोहोचली आहे. मुंबईत 46 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या आता 6 हजार 842 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 78 टक्क्यांवर आले आहे तर रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 87 दिवसांवर पोहोचला आहे.