
आसावरी जोशी,[email protected]
आज ‘वस्त्रहरण’ पुन्हा त्याच दिमाखात रंगभूमीवर दाखल होतंय… फणसासारख्या रांगडय़ा आणि रसाळ मालवणी बोलीतील हे नाटक म्हणजे रंगभूमीवरील मानाचे पान… या निमित्ताने ‘वस्त्रहरण’चा प्रवास आणि निर्माते प्रसाद कांबळींशी गप्पा…
अभिनय करण्याच्या वाटेला प्रसाद कधी जात नाही. कारण खोटं वागणं त्याला जमत नाही. प्रसादचे हे विधान खूप खरेपणा दाखविणारे.
मूळच्याच समृद्ध असलेल्या मराठी रंगभूमीला कोकणातील ओबडधोबड पण रसाळ मालवणी बोलीतील मेळे, ललित या नाटय़ प्रकारांनी अगदी फणसागत समृद्ध केलंय. गेल्या शनिवारी फेसबुकवर एका छोटय़ाशा बातमीने लक्ष वेधून घेतलं. वस्त्रहरण पुन्हा रंगभूमीवर प्रयोग क्रमांक ५२१२. गेली ५० हून कितीतरी वर्षे वस्त्रहरण हे सदाबहार मालवणी नाटक रसिक प्रेक्षकांना खदखदून हसवतंय. मनात घर करून राहिलंय. ज्येष्ठ नाटय़ अभिनेते मच्छिंद्र कांबळी अर्थात बाबूजींची ही निर्मिती असली, लेखक गंगाराम गवाणकरांच्या अपरिमित कष्टातून आणि अस्सल मालवणी विनोदातून लिहिली गेलेली ही त्यांची कलाकृती असली तरीही ‘वस्त्रहरण’ हे खऱया अर्थाने प्रेक्षकांचं नाटक आहे. कारण मान्यवर ते सामान्य वर्गापर्यंत सगळय़ांनी या निखळ, निर्मळ कलाकृतीवर मनापासून प्रेम केलं आहे. निरागस तरीही इब्लीस मालवणी बोलीचा गोडवा आम्हा प्रेक्षकांच्या मनात अजूनही रेंगाळतो आहे. म्हणूनच पुन्हा रंगभूमीवर दाखल होणाऱया ‘वस्त्रगरण’ने ‘फुलोरा’च्या पहिल्या पानावर मानाचे स्थान मिळवले.
नवनाथ प्रसाद कांबळी. अतिशय गुणी नाटय़निर्माता. बाबूजींनंतर प्रसादने केवळ भद्रकाली प्रॉडक्शन्सची धुरा सांभाळली नाही तर त्याने खऱया अर्थाने रंगभूमीची शान वाढवली आहे. त्याची निर्मिती असलेले प्रत्येक नाटक हेच दाखवून देतंय. आणि आता ‘वस्त्रहरण’.
१९६२ मध्ये लिहिल्या गेलेल्या ‘आज काय नाटक होवचा नाय’ या एकांकिकेचं ‘वस्त्रहरण’ म्हणून नामांतर होतं आणि रसिकमनावर या नाटकाचं अक्षरशः गारूड होतं. कोकणात जत्रा, हनुमान जयंती, रामनवमी या उत्सवांनिमित्त गावातील हौशी कलाकार मेळे किंवा लळित असे नाटय़प्रकार सादर करीत. दशावताराचाच हा एक भाग. एखादी पौराणिक कथा किंवा पौराणिक प्रसंग घेऊन उत्स्फूर्त सादरीकरण करायचं. लळितामध्ये तर ३०-४० पात्रांचा सहज सहभाग असायचा. काही कलावंत तर एकाच वेळी पाच-सहा भूमिका साकारायचे. परंतु एका भूमिकेतून दुसऱया भूमिकेत जाताना पहिल्या भूमिकेचा त्यात अजिबात लवलेशही नसायचा. जे.जे. कला महाविद्यालयाचे विद्यार्थी असलेल्या गंगाराम गवाणकरांनी ही एकांकिका लिहिली. महाविद्यालयातील शिक्षकांच्या नजरेखालून जाऊन तिची असंख्य वाचनं होऊन ‘वस्त्रहरण’ या नावानिशी ही एकांकिका रंगभूमीवर उभी राहिली.
भद्रकालीचा जन्मच ‘वस्त्रहरणा’साठी
प्रसाद सांगतो, भद्रकाली प्रॉडक्शनचा जन्मच मुळी वस्त्रहरणासाठीच झाला. पप्पांचे या नाटकवर फार प्रेम. त्यांनी याचे ४९२३ प्रयोग केले. त्यानंतर लवकरच वस्त्रहरणा‘चा पाच हजारावा प्रयोग मान्यवरांच्या संचात आम्ही सादर केला. त्यानंतर २०१२मध्ये वस्त्रहरणाचे ३० प्रयोग केले. आता त्याच संचात आम्ही पुन्हा ‘वस्त्रहरण’ आज आणतोय. पाच हजारांच्या वर प्रयोग होणारे ‘वस्त्रहरण’ हे एकमेव नाटक आहे. प्रत्येकवेळी या नाटकावर रसिकांनी भरभरून प्रेमच केले आहे. सुरुवातीला संतोष मयेकर तात्या सरपंच साकारायचा, पण २०१२ पासून दिगंबर नाईकने त्यात रंग भरले आहेत. मुळात ही पप्पांची अजरामर भूमिका.
हे सारे संभाषण खरे पाहता फोनवरूनच होत होते. प्रसादला प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा असूनही वेळेअभावी ते शक्य झाले नाही, पण फोनवरही तो खूप मनापासून आणि समरसून बोलत होता.
मुळात पप्पांनी वस्त्रहरण उभं करायला खूप मेहनत घेतली. मी स्वतः जरी यातील कोणत्याही निर्मिती प्रक्रियेत नसलो तरी त्यांची मेहनत मी खूप जवळून पाहिली आहे. ते स्वतःच एक ब्रॅण्ड होते. आणि ‘वस्त्रहरण’वर त्यांचा विशेष जीव होता.
पुलंचे कौतुकाशीर्वाद
येथे प्रसादशी बोलताना मला वाचलेला एक किस्सा आठवला. पुण्यात वस्त्रहरणाचा प्रयोग लागला होता. पु.ल. आणि सुनीताबाई नाटक पाहायला हजर होते. नाटकाचे लेखक गंगाराम गवाणकर बाबूजींना म्हणाले, ‘बाबू आज तुझी खरी कसोटी आसा! सगळी ताकद पणाक लाव. आज जिंकलंव तर ह्याच आयुष्यभर पुरवून पुरवून जगू.’ बाबूजी म्हणाले, ‘तुम्ही कायव काळजी करू नुका. आज आम्ही काय करतव ता बगीतच ऱहवा.’ नाटक संपल्यावर भाई रंगपटात आले आणि म्हणाले, ‘गवाणकरानू हसून हसून ज्या ज्या दुखुचा ता सगळा दुखल्याला आसा. पण ही मालवणी कोंबडी माका बिन गरम मसाल्याशिवाय खाल्ल्यासारखी वाटली. तवा फुडच्या टायमाक माका या नाटक मालवणीत बगुचा आसा’ एवढंच बोलून भाई थांबले नाहीत, तर बाबूजींना त्यांनी तीन अटी घातल्या.
या नाटकाचा महोत्सवी प्रयोग शिवाजी मंदिरात करायचा.
त्या प्रयोगाला भाई अध्यक्ष म्हणून येणार.
नाटक संपल्यावर गोमंतकमध्ये बांगडय़ाच्या तिकल्याचं जेवण घालायचं.
मला वाटते यातून वस्त्रहरण आंतरराष्ट्रीय प्रवासाचा मार्ग सोपा झाला. अगदी परदेशातील उच्च विद्याविभूषित मंडळींनीही वस्त्रहरण पूर्ण मालवणी बोलीतच अनुभवण्याचा आग्रह धरला.
संस्कार महत्त्वाचे
प्रसाद त्याच्या संपूर्ण नाटक प्रवासाविषयी सांगताना म्हणाला की, माझा नाटकाशी दुरान्वयानेही संबंध नव्हता. पप्पा गेल्यानंतर मी भद्रकालीत लक्ष घातले. जे हाती घेऊ ते उत्तमच पार पडलं पाहिजे हे संस्कार घरातून, बालमोहन अर्थात शाळेतूनच मिळालेले. शिवाय या दोन्ही ठिकाणांहून मिळालेला वाचन संस्कारही होताच. त्यामुळे मला आवडलेली पटकथा मी उचलतो आणि त्यावर कामाला लागतो. माझं सगळं लक्ष नाटकाच्या गाभ्यावर असते. प्रसाद स्वतःला नेहमी प्रेक्षकांच्या जागी ठेवतो. प्रेक्षकांची अभिरुची एकदा समजली की पुढच्या गोष्टी सोप्या होतात.
आज अनेक चांगली नाटके येत आहेत, चांगले कलाकार मेहनत घेत आहेत. या सर्व सकारात्मक गोष्टींमुळे मराठी रंगभूमी अधिकाधिक समृद्ध होते आहे. दर दशकात मराठी रंगभूमी प्रत्येक गुणी कलावंताच्या मेहनतीने समृद्ध झालेली मी पाहतोय. प्रत्येक ज्येष्ठ कलावंताचे येथे योगदान आहे. कोणाच्याही कुबडय़ांशिवाय मराठी नाटकाची वाटचाल दिमाखात सुरू आहे.
मर्यादित प्रयोगांच्या नाटकांविषयी बोलताना प्रसाद म्हणाला, हे उगाच हाइप असतात. सिम्पथी आणि हाइप या दोन्ही गोष्टींचा मला तिटकारा आहे. मुळात मराठी प्रेक्षक सुजाण आणि हुशार आहे. चांगल्या वाईटाची त्याला उत्तम जाण आहे. त्यामुळे मुळचेच चांगले नाटक चालायला अशा गोष्टींची गरज पडत नाही.
असंख्य दर्जेदार नाटकांची निर्मिती करत नवनाथ प्रसाद मच्छिंद्र कांबळींची वाटचाल डौलात सुरू आहे. ‘वस्त्रहरणा’चा ५२१२वा प्रयोग आज सादर करून त्याच्या पप्पांच्या हृदयीची आवडी पुन्हा एकवार रंगमंचावर आणली आहे. ‘तवा प्रसादच्या या चांगल्या कामाक यश दे रे महाराजा.’ ‘व्हय म्हाराजा!’






















































