
>> प्रसाद ताम्हनकर
राजधानी दिल्लीची वाढती प्रदूषित हवा हे गेल्या काही वर्षांचे सर्वात मोठे दुखणे झाले आहे. गेल्या काही वर्षांत दिल्लीची सत्ता उपभोगलेल्या विविध पक्षांनी अनेक उपाय करून पाहिले. मात्र दिल्लीचे प्रदूषण काही कमी होताना दिसत नाही. अशातच आता इथल्या दिल्ली सरकारने क्लाऊड सीडिंग अर्थात कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवण्यास सुरुवात केली आहे. आयआयटी कानपूरने सेसना विमानाच्या मदतीने ह्या प्रक्रियेची अंमलबजावणी केली. मेरठच्या बाजूने दिल्लीत प्रवेश करताना ह्या विमानाने खेकरा, उत्तर करोल बाग, मयूर विहार आणि इतर काही महत्त्वाच्या भागात क्लाऊड सीडिंग केले.
क्लाऊड म्हणजे ढग आणि सीडिंग म्हणजे बी पेरणे. ह्या पेरणीमध्ये बी म्हणून सोडियम क्लोराइड, सिल्व्हर आयोडाइट आणि पोटॅशियम क्लोराइड यासारखे पदार्थ वापरले जातात. हे पदार्थ ढगांमध्ये असलेले पाण्याचे थेंब गोठवतात. त्यामुळे हे गोठलेले बर्फाचे कण एखाद्या गुच्छासारखे एकमेकांना चिकटतात आणि नंतर जमिनीवर कोसळतात. अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिन्सेंट शेफर याला या शोधाचे जनक मानले जाते. क्लाऊड सीडिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यापूर्वी ढगांची उपस्थिती अत्यंत महत्त्वाची असते. ढग नसल्यास या तंत्रज्ञानाचा वापर करणे शक्य होत नाही. त्यामुळे सर्वात आधी ढगांचा अभ्यास करणे गरजेचे असते. ढग आहेत का, असल्यास किती उंचीवर आहेत, वातावरण कसे आहे हे सर्व तपासले जाते. या सगळ्यानंतर ढगांमधील योग्य जागा हेरून तिथे बर्फाच्या पाण्याचे मिश्रण फवारले जाते.
प्रत्येक हिवाळ्याच्या सुरुवातीला राजधानी दिल्लीची हवा अत्यंत धोकादायक अशा श्रेणीमध्ये पोहोचलेली असते. हवेची गुणवत्ता एयर क्वालिटी इंडेक्स (AQI) अर्थात हवा गुणवत्ता निर्देशांकाद्वारे मोजली जाते. गेल्या दशकाच्या अभ्यास केल्यास दिल्लीमध्ये जवळपास प्रत्येक वर्षात 200 दिवस अथवा वर्षाचे 60 टक्के दिवस ही वाईट किंवा धोकादायक श्रेणीत राहिली आहे. गेल्या दशकात 70 पेक्षा जास्त दिवस AQI हा 500 पेक्षा जास्त होता, जो धोकादायक पातळीच्या कमाल मर्यादेपेक्षा देखील जास्त आहे.
सध्या क्लाऊड सीडिंगमुळे दिल्ली आणि तिची प्रदूषित हवा दोन्हीची चर्चेत आलेले असले, तरी दूषित हवा ही फक्त दिल्लीची समस्या उरलेली नाही. याच झ्घ्णिं् च्या अहवालानुसार दक्षिण आशिया हा जगातील सर्वात प्रदूषित प्रदेश बनलेला आहे. दक्षिण आशियाच्या इतर भागांचा आढावा घेतला तर बांगलादेश हा एयर क्वालिटी इंडेक्सनुसार जगातील दुसऱ्या क्रमांकाचा प्रदूषित देश आहे.
शिकागो विद्यापीठातील एनर्जी पॉलिसी इन्स्टिटय़ूट च्या ऑगस्ट 2025 च्या अहवालानुसार, दिल्लीतील प्रदूषित कणांचे उच्च प्रमाण एखाद्या व्यक्तीचे सरासरी आयुर्मान अंदाजे 8.2 वर्षांनी कमी करू शकते. हिवाळ्याच्या काळात दिल्ली सर्वाधिक प्रदूषित हवेचा सामना करते असे सांगितले जात असले, तरी इतर ऋतूंमध्ये देखील हवेचा दर्जा फार काही चांगल्या गुणवत्तेचा असतो असे अभ्यासात आढळून आले नाही. दिल्लीकर हे जवळपास संपूर्ण वर्ष प्रदूषित हवेचाच सामना करत असतात असे म्हणायला हरकत नाही.




























































