अ‍ॅप्सचे मायाजाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रसाद ताम्हनकर

जामतारासारखे जवळपास संपूर्ण गाव कॉलिंग फ्रॉडच्या माध्यमातून देशविदेशातील लोकांना गंडा घालत आहे, तर दुसरीकडे विविध अॅप्सच्या माध्यमातून लोकांना लुबाडले जात आहे. एखादा सरकारी अर्ज ऑनलाइन भरता न येणारी तरुणाई अशा फसव्या अॅप्सचा वापर करण्यात मात्र एकापेक्षा एक सरस बनत चालली आहे. दहावी-बारावीचा निकाल कुठल्या ठिकाणी ऑनलाइन बघता येईल याची त्यांना कल्पना नसते, पण मटका ऑनलाइन कुठे खेळता येईल आणि आकडा कुठे बघता येईल ते मात्र हमखास माहिती असते. यालाच डिजिटल क्रांती म्हणायचे का?

2022 सालापासून चौकशीच्या आणि संशयाच्या फेऱ्यात असलेला महादेव अॅप घोटाळा आता पुन्हा एकदा देशभर चर्चेत आला आहे. त्याला कारणदेखील तसे घडले आहे, महादेव अॅपच्या प्रवर्तकांकडून छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना 508 कोटी रुपये दिल्याचा दावा ईडीतर्फे करण्यात आला आहे. कपिल शर्मा, रणबीर कपूर इत्यादी बॉलीवूड सेलिब्रिटींपासून सुरू झालेले चौकशीचे सत्र आता छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचल्याने या महादेव अॅपच्या मायाजालाचा विस्तार नक्की कुठपर्यंत पोहोचला आहे असा प्रश्न सामान्य माणसाला पडला आहे.

कायद्याचा तपास जसजसा पुढे सरकतो आहे, तसतसे या प्रकरणात रोज थक्क करणारे नवनवे खुलासे होत आहेत. सौरभ चंद्राकर आणि उप्पल महादेव या दोन घोटाळेबाजांच्या मेंदूमधून ही महादेव अॅपची सुपीक कल्पना जन्माला आली. मूळच्या छत्तीसगडमधील भिलाई इथे राहणाऱ्या या दोन मुख्य आरोपींपैकी सौरभ चंद्राकर हा स्वत सट्टेबाजीच्या नादाला लागलेला तरुण होता. एका कापडाच्या दुकानात काम करत असलेल्या 26 वर्षांच्या सौरभला सट्टेबाजीच्या खेळाने इतके वेड लावले की, त्याने रवी उत्पलच्या मदतीने स्वतचे सट्टेबाजीसाठीचे अॅप सुरू केले.

या अॅपच्या मदतीने युजर्स पोकर, रमीसारखे ऑनलाइन गेम खेळू शकतात, क्रिकेट अन् फुटबॉलसारख्या खेळांवर सट्टा लावू शकतात आणि कहर म्हणजे या अॅपच्या माध्यमातून निवडणुकांवरदेखील बेकायदेशीर सट्टा लावता येत होता. छोटय़ा स्तरावर सुरू झालेला हा गोरखधंदा बघता बघता इतका विस्तारला की, या अॅपच्या माध्यमातून दोघांनी 5000 कोटी रुपयांचा घोटाळा केला. हे पैसे अत्यंत चलाखीने सामान्य माणसांना ऑनलाइन जुगाराचे व्यसन लावून त्यांच्या खिशातून काढण्यात आले.

सौरभ आणि रवी सध्या हिंदुस्थानी तपास संस्थांच्या आवाक्याबाहेर दुबईमध्ये आहेत. सामान्य माणसाला देशोधडीला लावणाऱ्या या दुकलीचे आयुष्य तिथे अत्यंत राजेशाही थाटात चालू आहे. यातील सौरभ चंद्राकरच्या लग्नात कोटय़वधी रुपयांचा खर्च करण्यात आला. लग्नात मनोरंजनासाठी बॉलीवूडच्या कलाकारांना आमंत्रित करण्यात आले होते आणि त्यांच्या नागपूर ते दुबई प्रवासासाठी खास चार्टर प्लेन भाडय़ाने घेण्यात आले होते. तिथे कार्यक्रम सादर करण्यासाठी या कलाकारांना 200 कोटींचे मानधन देण्यात आले आणि हा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला 112 कोटी रुपये हवालामार्गे देण्यात आल्याचा आरोप आहे.

सौरभ आणि रवी यांनी एखाद्या मोठय़ा कंपनीलादेखील लाजवेल अशा मार्गाने आपल्या धंद्याची घडी बसवली होती आणि विस्तार करत नेला होता. दुबईत मुख्य कार्यालय असलेल्या महादेव अॅपला अनेक शाखांमार्फत चालवले जात असे. प्रत्येक शाखेत एक मुख्य अधिकारी आणि तीन कामगार असत. अशा अनेक शाखा कार्यरत होत्या. या सर्व लोकांच्या नावाने हजारो बँक खाती उघडण्यात आली. अनेक खाती सामान्य, गरीब लोकांना कमिशनचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वापरायला घेण्यात आली होती. महादेव अॅपमध्ये पैसे गुंतवण्यासाठी लोकांना या खात्यांमध्ये पैसे भरण्यास सांगितले जात असे. मिळालेल्या नफ्यातून शाखेला 20 टक्के हिस्सा दिला जात असे.

शाखेच्या मुख्य अधिकाऱ्याला लोकांना युजर आयडी बनवून देण्याचे अधिकार दिलेले असत. युजर आयडी बनवल्यानंतर लोकांना दोन मोबाइल नंबर दिले जात. या नंबरवर फक्त व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून संपर्क साधणे शक्य होते. पहिला नंबर हा पैसे जमा करण्यासाठी आणि सट्टेबाजीतून मिळालेले पॉइंट्स जमा करण्यासाठी वापरता येत असे, तर दुसऱ्या नंबरच्या मदतीने मिळालेल्या पॉइंट्सचे वेबसाइटवर जाऊन बक्षिसात रूपांतर करता येत असे. महादेव अॅपच्या मालकांतर्फे त्यासाठी विविध नावांनी अनेक वेबसाइट उघडण्यात आल्या होत्या.

महादेव अॅपमुळे छत्तीसगड पहिल्यांदा चर्चेत आले, जेव्हा या घोटाळेबाजांनी सर्वात जास्त बँक खाती ही छत्तीसगडमध्ये उघडल्याचे तपासात स्पष्ट झाले. पुढे छत्तीसगडमधील अनेक तरुणांनी दुबईला जाऊन महादेव अॅपचे व्यवस्थापन शिकून घेतले आणि परत येऊन स्वतची शाखा सुरू केल्याचेदेखील उघड झाले आहे. लोकांना आधी जिंकू द्यायचे आणि मग खेळाचे, सट्टेबाजीचे व्यसन लागले की, त्यांना कफल्लक करून सोडायचे अशी फसवणूक करणाऱ्या या अॅपने अनेक तरुणांना गुन्हेगारी मार्गावर नेऊन सोडले आहे.

या महाघोटाळ्यात काही वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि राजकारणीदेखील सामील असल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे. या प्रकरणात एका पोलीस शिपायाला अटकदेखील करण्यात आली आहे. पोलीस दलात एएसआयसारख्या पदावर कार्यरत असलेला चंद्रभूषण वर्मा महादेव अॅपच्या वतीने अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना आणि राजकीय व्यक्तींना दर महिना ठरावीक रक्कम लाच म्हणून देत होता असे त्याने कबूल केले आहे. मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत पोहोचलेल्या या घोटाळ्याची पाळेमुळे किती खोल गेली आहेत हे आता त्या भगवान महादेवालाच माहिती!

डिजिटल क्रांतीचा जयजयकार करणाऱ्यांना नक्की कोणती डिजिटल क्रांती अपेक्षित होती? असा प्रश्न पडतो आहे. जमतारासारखे जवळपास संपूर्ण गाव कॉलिंग फ्रॉडच्या माध्यमातून देशविदेशातील लोकांना गंडा घालत आहे, तर दुसरीकडे विविध अॅप्सच्या माध्यमातून लोकांना लुबाडले जात आहे. शादी डॉट कॉमसारख्या चांगल्या उद्देशाने तयार झालेल्या माध्यमातून स्त्रियांची शारीरिक आणि आर्थिक फसवणूक केली जात आहे. डेटिंग अॅप्सच्या माध्यमातून ब्लॅकमेलची प्रकरणे घडत आहेत.

एखादा सरकारी अर्ज ऑनलाइन भरता न येणारी तरुणाई अशा फसव्या अॅप्सचा वापर करण्यात मात्र एकापेक्षा एक सरस बनत चालली आहे. दहावी-बारावीचा निकाल कुठल्या ठिकाणी ऑनलाइन बघता येईल याची त्यांना कल्पना नसते, पण मटका ऑनलाइन कुठे खेळता येईल आणि आकडा कुठे बघता येईल ते मात्र हमखास माहिती असते. यालाच डिजिटल साक्षरता म्हणायचे का? तरुणाई ज्यांना आदर्श मानते असे खेळाडू, अभिनेते, अभिनेत्री, विविध क्षेत्रांतील सेलिब्रिटी अशा धोकेबाज अॅप्सची मुक्तहस्ताने जाहिरात करीत असतात, हे अत्यंत चुकीचे आहे.

अशा अॅप्स किंवा वेबसाइटच्या माध्यमातून फसवणूक झाली तर कायद्याची काय मदत मिळते, कोणाशी संपर्क साधावा, अशी अॅप्स वापरताना काय सावधगिरी बाळगावी, कोणत्या वेबसाइटला भेट देण्याचे टाळावे अशी प्राथमिक माहितीदेखील आज लोकांना नाही. डिजिटल साक्षरतेच्या मोहिमेत डिजिटल सुरक्षा वाऱ्यावर सोडली गेली आहे. महादेव अॅप हे तर नुसते हिमनगाचे टोक आहे. सर्वसामान्यांना माहीत नसलेली कितीतरी धोकादायक अॅप्स आणि वेबसाइट खाजगी माध्यमातून सर्रास गरजवंतांपर्यंत पोहोचवली जात आहेत. देशातील कित्येक राज्यांनी आपापल्या क्षेत्रात ऑनलाइन बेटिंग गेम्स आणि अॅप्सवर बंदी लागू केली आहे. यामध्ये तेलंगणा, तामीळनाडू, ओडिशा, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि अन्य काही राज्यांचा समावेश आहे. हिंदुस्थानातील कित्येक राज्यांमध्ये जिओब्लॉकिंग फीचर वापरण्यात येत आहे. त्यामुळे ठरावीक राज्यातून ठरावीक गेम्सना अॅक्सेसच मिळत नाही. उदाहरण द्यायचं झाल्यास तेलंगणामधून ‘ड्रीम11’ हे फॅन्टसी गेमिंग अॅप डाऊनलोड करण्याचा पर्यायच उपलब्ध होत नाही. यावर पर्याय म्हणून कित्येक युजर्स व्हीपीएनचा वापर करतात. यामुळे युजरची लोकेशन त्या कालावधीपुरती बदलली जाते. कित्येक युजर्स शेजारची राज्ये किंवा थेट दुसऱ्या देशांमधील लोकेशनचा वापर करत असल्याचं समोर आलं आहे.

बेटिंग अॅप्सवर बंदी असली तरी कित्येक राज्यांमध्ये साध्या गेम्सवर बंदी नाही. त्यामुळे कित्येक गेमर्स पैशांचा व्यवहार नसणारे ऑनलाइन गेम्स खेळतात ज्यामध्ये पैशांचा व्यवहार करण्यासाठी ते व्हॉट्सअॅप आणि टेलिग्राम ग्रुप्सची मदत घेत}ाr जाते. लुडो, पोकर, रमी असे गेम्स खेळून ग्रुप्सवर त्यावर बेटिंग लावली जाते. चांगल्या इंटरनेट सुविधा, स्वस्तात मिळणारे स्मार्टफोन यामुळे ऑनलाइन बेटिंगचा बाजार सातत्याने वाढत आहे. ऑनलाइन अॅपच्या मदतीने बेटिंग सोपे झाले आहे. या अॅप्सच्या माध्यमातून नाणेफेकीपासून गोलंदाजी, जबरदस्त फलंदाजी, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण अशा अनेक प्रकारांत सट्टा लावण्यात येतो. फेअरप्ले, परीमॅच, बेटवे, वुल्फ, 777  यांसारख्या अॅपच्या माध्यमातून हा व्यवसाय चालतो. हे अॅप हिंदुस्थानबाहेरून चालवले जातात आणि स्पोर्टस् चॅनेल व ओटीटी प्लॅटफॉर्मवर यांच्या जाहिराती जास्त प्रमाणात दिसून येतात. महाराष्ट्रामध्ये अशा गेमिंगला बंदी नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी बंदी आहे त्या राज्यातील गेमर्स महाराष्ट्र किंवा इतर राज्यातील पत्ता असणाऱ्या गेमर्सच्या नावाने रजिस्ट्रेशन करून घेत आहेत.

तरुणांनी बदलत्या तंत्रज्ञानाची कास धरावी, जगाच्या वेगाशी बरोबरी करावी हे स्वप्न चुकीचे नक्की नाही. आपल्या देशात बुद्धिमत्तेची कमतरता निश्चित नाही. मात्र ही बुद्धिमत्ता योग्य ठिकाणी कशी वापरली जाईल हे बघणेदेखील महत्त्वाचे आहे. ही बुद्धी काही चांगले घडवण्यासाठी, उच्च शिक्षणासाठी न वापरता झटपट पैसा मिळवण्यासाठी वापरली जात आहे हे दुर्दैव आहे. अशा जुगारी अॅप्सवर कोणतेही प्रतिबंध, नियम नसल्याने. आपण जे काही करतो आहे, ऑनलाइन पत्ते खेळतो आहे, बेटिंग करतो आहे ते सगळे कायदेशीर आहे. त्यात अनैतिक असे काही नाही अशी एक ठाम धारणा बनत चालली आहे, जी जास्त घातक आहे.

गेली काही वर्षे अनेक सामाजिक नेते, समाज तज्ञ, मानसोपचार तज्ञ, फसवणुकीला सामोरे गेलेले लोक या अॅप्स आणि वेबसाइटविरुद्ध टाहो फोडत आहेत. मात्र तो टाहो कानावर पडूनदेखील त्याची दखल घेतली जात नाही हे दुर्दैव आहे. कुठलीही कागदपत्रे न मागता अवघ्या काही मिनिटांत हजारो रुपयांची लोन देणारी अॅप्स, रमी, तीन पत्ती, पोकरसारखे खेळ खेळून लाखो रुपये कमावण्याची संधी दाखवणारी अॅप्स उपलब्ध असताना कष्टाची किंमत कोणाला कळणार आणि लक्ष्मी अन् अलक्ष्मीमधला फरक कसा उमजणारऱ्या डिजिटल क्रांती म्हणवली जात असे} तर, तिची फळे समाजाला निक्रिय बनवणारी आणि अधोगतीला नेणारी असणार आहेत असेच सध्याचे चित्र आहे आणि हे चित्र बदलण्याची जबाबदारी सरकारसोबत एक समाज म्हणून आपलीदेखील आहे.

(लेखक सायबरतज्ञ आहेत) [email protected]