
>> प्रसाद ताम्हणकर
चीनच्या मदतीने सौदी अरेबिया अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या तयारीत असल्याच्या बातमीने जगभरात चांगली खळबळ उडवली आहे. विशेषत अरब देशांमध्ये त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. चायना नॅशनल न्यूक्लिअर कॉर्पोरेशन या चीन सरकारच्या अधिकृत कंपनीने सौदी अरेबियाला कतार आणि सौदी अरेबियाच्या सीमेजवळ एका अणुऊर्जा प्रकल्पासाठी प्रस्ताव सादर केला आहे. अणुऊर्जा तंत्रज्ञान देण्यासाठी अमेरिकेकडून सौदी अरेबियाला काही जाचक निर्बंधांचे पालन करण्यास सांगण्यात आले आहे, त्याला कंटाळून सौदी अरेबियाने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
सौदी अरेबियाला अणुऊर्जा तंत्रज्ञान देण्यास अमेरिका नक्की तयार आहे. मात्र त्यासाठी सौदी अरेबियाने युरेनियम आणि प्लुटोनियमची पुनर्प्रािढया थांबवण्यासाठीचा करार मान्य करायला हवा असे अमेरिकन अधिकाऱयांचे म्हणणे आहे, तर सौदी अरेबियाने ही चाल रचून अमेरिकन प्रशासनाला नमवण्याचा प्रयत्न केला आहे अशी काही सौदी अधिकाऱयांच्या आतल्या गोटातील चर्चा आहे. अरब देशांमध्ये चीनचा वाढता प्रभाव अमेरिकेला सहन होणारा नाही. अशा वेळी सौदी अरेबियाची चीनशी वाढती जवळीक पाहता अमेरिकेने अणुऊर्जा तंत्रज्ञान सौदी अरेबियाला देण्यापूर्वी ज्या काही जाचक अटी, नियम घातले आहेत, त्यात बायडन प्रशासन काही सवलत देईल असा अंदाज व्यक्त होत आहे.
अमेरिकेने यासंदर्भात आपले कडक धोरण कायम ठेवले आणि चर्चेतून काही निष्पन्न झाले नाही, तर सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बीन सलमान हे काहीसा धाडसी निर्णय घेऊन या प्रकल्पासाठी चिनी कंपन्यांना आमंत्रित करू शकतात हे तर आता उघड झालेले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अमेरिकेने जशा जाचक अटी सौदी अरेबियासमोर ठेवल्या आहेत, तशा कुठल्याही अटी चीन सरकारने ठेवलेल्या नाहीत. अशातच सौदी अरेबियाच्या ऊर्जामंत्र्यांनी देशात अणुभट्टय़ा उभारण्यासाठी कंत्राट देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे जाहीर केले आहे आणि काही कंपन्यांना आमंत्रित केल्याचेदेखील स्पष्ट केले आहे.
सौदी अरेबिया आणि इराण यांचे शत्रुत्व हे तसे जुने आहे. काही काळापूर्वी चीनने त्यांच्यात समेटाचा करार घडवून आणला असला तरी ही शांतता फसवी आहे. जर इराण अण्वस्त्र बनवत असेल तर सौदी अरेबियादेखील अण्वस्त्र बनवणार असे प्रिन्स सलमान उघडपणे सांगतात. त्यासाठी त्यांना नागरी आण्विक उपक्रम सुरू करायचा आहे, जो पुढे अण्वस्त्र बनवण्यासाठी उपयोगी पडेल हे उघड गुपित आहे. सौदी अरेबियाकडे ऊर्जा आणि आयातीसाठी युरेनियमचा पुरेसा साठा आहे असादेखील त्यांना विश्वास आहे. हा कार्यक्रम यशस्वी झाल्यास अरब जगतासह सर्वदूर सौदी अरेबियाची राजकीय ताकददेखील वाढणार आहे.
सौदी अरेबिया आपली शक्ती वाढवण्यासोबत आर्थिक फायद्यासाठीदेखील अणुऊर्जा प्रकल्पाकडे पाहते आहे. आजवर फक्त तेलावर आधारित असलेली आपली अर्थव्यवस्था बहुआयामी व्हावी यासाठी प्रिन्स सलमान सतत प्रयत्नशील असतात. त्यासाठी वेगवेगळे उपाय ते अमलात आणत आहेत. पर्यायी ऊर्जा हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. हरित ऊर्जा अर्थात ग्रीन एनर्जी आणि ग्रीन एनर्जी बिल्डिंग हा त्याचाच एक महत्त्वाचा भाग आहे. यासाठी सौदी अरेबिया आपले स्वतःचे असे एक वेगळे परराष्ट्र धोरण आखण्यात मग्न आहे. चीनशी वाढती जवळीक हा त्याचाच एक भाग आहे.
इस्रायलने सौदी अरेबियाच्या अणु कार्यक्रमाला तीव्र विरोध दर्शवला आहे. असे म्हणतात की, इस्रायल मान्य करत नसला तरी मध्यपूर्वेकडे जे सर्व देश आहेत, त्यातला तो एकमेव अण्वस्त्रधारी देश आहे. दुसरीकडे इराणसारख्या देशाला अणुशक्ती प्राप्त झाल्यास मध्यपूर्वेत सर्व देश अणुऊर्जा मिळवण्याच्या शर्यतीत उतरणार ही भीती अमेरिकेला आहे. या देशांना अणुऊर्जा आणि अण्वस्त्र यांपासून कायम लांब ठेवण्याची काळजी अमेरिकेने घेतलेली आहे. मात्र इस्रायलच्या करामतींकडे अमेरिका कायम दुर्लक्ष करत असते आणि दुटप्पी भूमिका घेते अशी पूर्वीपासून अरब जगताची पार आहे. आता या पेचप्रसंगात अमेरिका कशी मार्ग काढते यावर अनेक देशांचे पुढचे आण्विक भविष्य अवलंबून असणार आहे.




























































