हातासोबत एखाद-दोन भांडी पण घासत चला!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

<<प्रशांत दामले>>

सद्य परिस्थितीत सगळ्यांनी सकारात्मक विचार केला तर ते जास्त सुखकारक होईल. एरवी आपण कामानिमित्त दिवसाचे 12 तास घराबाहेर असतो. पण या सुट्टीत घर अधिक स्वच्छ आणि नीटनेटके कसे ठेवता येईल याकडे आपण लक्ष देऊ शकतो. कुटुंबासोबत एकत्र गप्पा मारू शकतो. तब्येतीकडे लक्ष देऊ शकतो. आवडता छंद जोपासू शकतो. ज्या गोष्टी इतक्या दिवसात करायच्या राहून गेल्यात त्या देखील करू शकतो. एकत्र जेवणाची पूर्वीची पद्धत गेल्या काही वर्षात हरवली होती ती आता पुन्हा अनुभवायला मिळते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपले खर्च किती कमी आहे हे या निमित्ताने आपल्याला कळाला आहे. स्वतःवर प्रेम करायला शिकले तर आपण सगळे व्यवस्थित होईल. सध्या मी तब्येतीकडे जास्त लक्ष देतोय रोज सकाळी न चुकता व्यायाम करतो. पूर्वीचे लोक खाली बसून केअर काढायचे आणि शेणाने घर चालवायचे म्हणून त्यांचे पोट सुटायचे नाही. म्हणून मी देखील आता खाली बसून केअर काढतोय. कधीतरी छान वामकुक्षी घेतो पण वामकुक्षीची सवय लागली तर नाटकाचे दुपारचे प्रयोग करायचे कसे असा प्रश्न देखील पडलेला आहे. गाण्याचा रियाज देखील सुरू आहे. गेल्या काही दिवसात 50 ते 60 नाटकांच्या स्क्रीप्ट माझ्याकडे आल्या होत्या, त्यांचे वाचनही करतोय. या निमित्ताने भविष्यात एखादे चांगले नाटक रंगभूमीवर येऊ शकते.

लॉकडाऊनच्या सुरुवातीलाच सुखी संसारासाठी सोशल मीडियावरून काही टिप्स दिल्या होत्या. त्याला ‘दामले मास्तरांची शाळा’ असे नाव दिले होते. घरातल्या किचनचा अधिकार पूर्णपणे महिलांकडे असतो त्यामुळे त्यात आपण उगाच लुडबूड करू नये. उलट 20 सेकंद हात धुवायला गेल्यानंतर एखाद-दोन भांडी पण धुवत चला. लोळत राहून बायकोची चिडचिड वाढवू नका, वेळ जात नाही म्हणून एकमेकांशी भांडू नका. या काळात अनोळखी माणसाला तुसडेपणाने वागू नका. अशा काही टिप्स शेअर केल्या होत्या लोकांचाही त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. कोरोनाच्या बाबतीत बोलायचे तर त्याला फारसे घाबरण्याची गरज नाही पण सध्या त्यावर औषध नसल्यामुळे आपल्याला काळजी घ्यायची आहे. बाहेर जाताना पायाला चटके लागू नये म्हणून आपण चप्पल घालतो त्याचप्रमाणे आपल्याला घरात राहून संपूर्ण कुटुंबाची काळजी घ्यायची आहे.

रंगमंच कामगारांना सांभाळणे माझे कर्तव्य
नाटक हे एक टीमवर्क आहे. 24 रंगमंच कामगार गेले अनेक वर्ष माझ्यासोबत काम करताहेत. कुटुंबप्रमुख म्हणून त्यांची या काळात मी मदत केली. मराठी नाटक समूहा’तर्फे देखील 275 रंगमंच कामगारांना प्रत्येकी अडीच हजार रुपयांप्रमाणे मदत करण्यात आली आहे. यापुढे देखील ही मदत सुरू राहील. नाट्यसृष्टीच्या भविष्याबाबत बोलायचे तर पुढे सगळाच अंधार आहे. चांगली नाटकं येथील पण प्रेक्षक किती येतील असा विषय आहे. सगळे काही सुरळीत झाल्यावर नाट्यगृहांमध्ये प्रेक्षकांना सुरक्षित वाटेल असे वातावरण तयार केले पाहिजे, तरच प्रेक्षकांची पावले नाट्यगृहांकडे वळतील