राजकारणी हाच श्रेष्ठ नट! प्रशांत दामले यांची ‘धमाल मस्ती’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाटय़ चित्रपट कलाकारापेक्षा लोकप्रतिनिधी हाच श्रेष्ठ नट आहे. कारण त्याला सर्वच भूमिका पार पाडत 24 तास काम करावे लागते असे मत अभिनेते, निर्माता प्रशांत दामले यांनी व्यक्त केले.

कुर्ला प्रबोधन शाळा आणि पल्लवी  फाउंडेशनच्या वतीने आयोजित धमाल एक्स्प्रेस ऑनलाईन उन्हाळी शिबीरात सहावे पुष्प प्रशांत दामले यांनी गुंफले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेच्या विधान परिषदेच्या आमदार मनीषा कायंदे, पल्लवी  फाउंडेशनचे अध्यक्ष भाऊ कोरगावकर उपस्थित होते.

दामले पुढे म्हणाले की , मला खूप आनंद आहे की मला नाटय़ क्षेत्रात करिअर करता आले. जर मी नट झालो नसतो तर  सी ए आकाउंटन्ट झालो असतो किंवा गायक झालो असतो . पण नाटक हा माझा छंद होता आणि मी जोपासलेला छंदच मी व्यवसाय म्हणून स्वीकारला म्हणून मी आनंदी आणि सुखी आहे. तुम्ही सुद्धा करिअर निवडताना आपला छंदच व्यवसायात परावर्तित करा तरच तुम्ही आनंदी रहाल आणि व्यवसायात व जीवनात यशस्वी व्हाल. असा सल्ला त्यांनी आपल्या मुलाखती दरम्यान दिला. नयना परदेशी आणि अर्चना म्हात्रे यांनी प्रशांत दामले यांची मुलाखत घेतली.

प्रत्येक क्षेत्रात आहे भाषा व शब्द यांना  महत्त्व

मुलांच्या व्यक्तिमत्व विकासात आपल्या व्यक्त होण्याच्या बोलण्याच्या भाषेला व शब्दांना अनन्य साधारण महत्त्व आहे. तुम्ही निवडलेले करिअरचे क्षेत्र कोणतेही असो. तिथे तुम्हाला सादरीकरण करताना शब्द आणि भाषा काय वापरता यावर तुमचे त्या क्षेत्रातील यश अपयश अवलंबून असते. असे मत कोकणचे सुपुत्र प्रसिद्ध लेखक, अभिनेता व दिग्दर्शक श्रीनिवास नार्वेकर यांनी व्यक्त केले.

हल्लीच्या काळात प्रमाण भाषा किंवा बोली भाषा असे काही नाही परंतु त्याचा वापर करून संभाषण साधताना ते प्रभावी कसे होईल यावर भर दिला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या भाषा संवर्धनासाठी त्याची शब्द संपदा वाढविण्यासाठी पालकांबरोबरच शिक्षकांनी देखील प्रयत्न करावेत, असे नार्वेकर म्हणाले. यावेळी नार्वेकर यांची प्रकट मुलाखत सौ विशाखा परब व दीपाली पडवळ यांनी घेतली. यावेळी माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.