ठसा – रंगनाथ पठारे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

साहित्य अकादमी पुरस्कार विजेते ज्येष्ठ लेखक ‘ताम्रपटकर’ रंगनाथ पठारे यांना अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनचा नुकताच पुरस्कार घोषित झाला. त्यांच्या निमित्ताने सत्य जपणाऱ्या भाषाकाराचा गौरव झाला आहे. तत्कालीन राज्य सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी जी समिती 2012 साली स्थापन केली होती त्याचे अध्यक्षपद पठारे यांच्याकडे आहे. आपल्या कार्यकाळात त्यांनी अध्यक्ष या नात्याने दीड दोन वर्षे अथक परिश्रम घेऊन 500 पानांचा जो महत्त्वपूर्ण अहवाल दिला. त्याला मान्यताही मिळाली. तथापि मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणाऱ्या प्रतीक्षेत आहे. केंद्र शासनाने त्यावर अंतिम शिक्कामोर्तब करावे यासाठी समस्त मराठी भाषाप्रेमींनी आग्रहाची भूमिका घेतली पाहिजे. तेव्हाच पठारे यांनी केलेल्या कार्यासही फळ मिळू शकेल आणि त्यांनी घेतलेली मेहनतही सार्थकी लागेल. साहित्य क्षेत्रातील कथा, कादंबरी लेखन, वैचारिक समीक्षा अशा महत्त्वाच्या प्रांतात पठारे यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. संगमनेर येथील महाविद्यालयात भौतिक शास्त्र हे त्यांचे प्रदीर्घकाळ अध्यापनाचे क्षेत्र राहिले आहे. त्या क्षेत्रात ते जेवढे रमतात तेवढेच साहित्याच्या विविध लेखन प्रांतातही रमतात; मात्र दोन्ही ठिकाणचे पठारे हे वेगळे असतात. कथा लेखक, कादंबरीकार म्हणून त्यांचा नाव लौकिक तर आहेच. व्यासंगी समीक्षक म्हणून त्यांनी छाप सोडली आहे. राजकीय लेखन, वैचारिक प्रांतातही त्यांचा दबदबा आहे. त्यांच्या लेखनाचे विषय, आशय मांडणी भाषा शैली ही वाचकांना प्रभावित करणारी असते. एखादी कथा म्हणजे सत्त्वाचा शोध असतो आणि समकालीन वास्तवाला दिलेली ती प्रतिक्रिया असते किंवा ती स्वतःच्याच अंतरंगात चाललेली घालमेल असते. अशी घालमेल त्यांच्या अनेक कथांमध्ये दिसते. कथेतील घालमेल वाचकांना खूप आत आवर्तनात घेऊन जाते. पठारे मराठी लघुकथेला मूळ स्वरूपांकडे घेऊन जातात याचे एक उदाहरण म्हणजे, ‘शंखातील माणूस’ या कथासंग्रहातील एका कथेचे देता येईल. ‘गांधीजी 11 सप्टेंबर 2001’ ही कथा वाचकांनी जरूर वाचावी. तेव्हा पठारे यांच्या प्रतिभेचा दर्जा समजू शकतो. ज्या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे ती महत्त्वाची कादंबरी ‘ताम्रपट’चा येथे उल्लेख करायला हवा. लेखकाने या कादंबरीत सहकार, राजकारण, जाती-पाती यात झालेला मोठा बदल या कादंबरीत येतो. पठारे यांची अलीकडची मोठी कादंबरी (796 पृष्ठs) ‘सातपाटील कुल वृत्तांत’ याचाही उल्लेख करणे आगत्याचे नि महत्त्वाचे आहे. या कादंबरीत लेखकाने स्वातंत्र्योत्तर काळातील मोठा पट वाचकासमोर मांडून सात पिढय़ांचा पाटील कुल वृत्तांत सांगितला आहे. मराठीतील कादंबरीचे दालन अनेक श्रेष्ठ ज्येष्ठ कादंबरीकारांच्या प्रतिभेने सशक्त आणि समृद्ध झाले आहे; मात्र राजकीय कादंबरी लेखन फार कमी लेखकांनी केले आहे. त्यात पठारे यांचा समावेश करावा लागेल. ‘मला माहीत असलेले शरद पवार’ हा त्यांनी लिहिलेला व्यक्तिचित्रण संग्रह येथे यानिमित्ताने आठवतो. कादंबरीच्याच अनुषंगाने त्यांचा ‘आजची कादंबरी नोंदी आणि निरीक्षण’ हा वैचारिक लेखसंग्रह वाचकांनी, अभ्यासकांनी जरूर वाचला पाहिजे. या क्षेत्रात लेखन करणाऱ्या लेखकांसाठी हा संग्रह मार्गदर्शनपर असाच आहे.

त्याचप्रमाणे अनुभव विकणे आहे. ईश्वर मृत आत्म्यास शांती देवो, गाभाऱ्यातील प्रकाश, तीक्र दुःखाचे कोमल प्रकरण, शंखातला माणूस (कथासंग्रह), चित्रमय चकोर (दीर्घ कादंबरी), दिवे गेलेले दिवस, कुंठेचा लोकल, चक्रव्यूह, चोषक फलोद्यान, टोकदार सावलीचे वर्तमान, ताम्रपट, रथ, दुःखाचे श्वापद, नामुश्कीचे स्वगत, हारण, सातपाटील कुल वृत्तांत (कादंबऱ्या) प्रत्यय आणि व्यत्यय (मुलाखत) प्रश्नांकित, अस्वस्थतेचे प्रश्न (निबंध) एका आरंभीचे प्रास्ताविक, सत्त्वाची भाषा (लेखसंग्रह), कादंबरी आणि लोकशाही (ललित – अनुवाद), छत्तीसगडचे निमयोगी आंदोलन, जागतिकीकरण आणि देशीवाद, आजची कादंबरी नोंदी आणि निरीक्षण (वैचारिक), भर चौकातील अरुण्यरुदन (सामाजिक) अशा विविधांगी लेखनाचा उल्लेख करावा लागेल. या सर्व लेखन प्रवासाच्या वाटचालीत आता अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनच्या साहित्य जीवन गौरव पुरस्काराची भर पडली आहे. या पुरस्कारासाठी त्यांची झालेली निवड सार्थ अशीच आहे.

>> प्रशांत गौतम